साखरपुड्यानंतर हॉटेल रुममध्ये तरुणीवर बलात्कार ! 8 जागी चावला; फोन करुन मित्रांना बोलवून.......
उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्न ठरलेल्या तरुणीवर तिच्याच होणाऱ्या नवऱ्याने बलात्कार करुन आपल्या मित्रांनाही तिची छेड काढण्यासाठी बोलावल्याची घटना प्रकाशझोतात आली आहे. ऋषिकेश इथे एकत्र फिरायला गेलेले असताना अंशु चौधरी नावाच्या तरुणाने हा विकृत प्रकार त्याच्याच होणाऱ्या बायकोबरोबर केला. अंशु आणि त्याच्या मित्रांनी केलेल्या अत्याचारामुळे तरुणीला मानसिक धक्का बसण्याबरोबर तिच्या शरीरावर या अत्याचारादरम्यान अनेक जखमाही झाल्या आहेत. या प्रकरणामध्ये पोलिसांनी शुक्रवारी मुख्य आरोपीला अटक केली.
शरीरावर आठ ठिकाणी घेतला चावा
समोर आलेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय पीडितेने काही दिवसांपूर्वीच आपला जबाब नोंदवला होता. यामध्ये तिने अंशुबरोबर आपला साखरपुडा झाला होता असं सांगितलं आहे. लग्न ठरल्यानंतर एकत्र फिरायला जाऊ असं म्हणत अंशु या तरुणीला ऋषिकेशला घेऊन आला. दोघांनी हॉटेलमधील रुममध्ये प्रवेश केल्यानंतर अंशु आक्रमक झाला. अंशुने माझ्यावर बलात्कार केला, असं या तरुणीने म्हटलं आहे. शरीरावरील आठ वेगवेगळ्या भागांवर त्याने चावा घेतल्याचा दावाही या तरुणाने केला आहे. आपल्याला असहाय्य वेदना होत असतनाही तो आपला छळ करत होता असं तरुणीने जबाबात म्हटलं आहे. डोळ्यावर, पाठीवर अंशुने चावा घेतल्याचं सांगितलं जात आहे.
अत्याचार झाल्याचं वैद्यकीय चाचणीमध्ये सिद्ध झालं
गाझियाबादचे पोलीस उपायुक्त राकेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीच्या वैदयकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामधून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट होत आहे. कोर्टासमोरही या तरुणीने तिच्यावर हॉटेल रुममध्ये तिच्या होणाऱ्या पतीने बलात्कार केल्याची कबुली दिली असल्याचं कुमार यांनी सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सारा प्रकार 21 ऑगस्ट रोजी घडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे दोघे एकत्रच गाझीयाबादला परत निघाले. मात्र वाटेत आरोपीने त्याच्या तीन मित्रांना फोन करुन बोलावून घेतलं. या तिघांनीही या तरुणीचा छळ केल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचं 'इंडियन एक्सप्रेस'ने म्हटलं आहे.
आरोपींना केली अटक
पीडित मुलीच्या आईने 24 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची पहिल्यांदा दखल घेतली. आरोपींनी आमच्या मुलीची छेड काढून तिला गाझियाबाद पेट्रोल पंपवर सोडून पळ काढला. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली आहे.अंशुबरोबरच त्याचे मित्र आदित्य कपूर, यश उंजाल, मुस्ताफा या तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.