logo

जनसामान्यांचे प्रेरणास्रोत निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज

जनसामान्यांचे प्रेरणास्रोत निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज
हरजीत निषाद (दिल्ली)
(निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या दिव्य जीवनातून प्रेरणा प्राप्त करण्यासाठी दरवर्षी 13 मे हा दिवस संत निरंकारी मिशनच्या वतीने जगभर “समर्पण दिवस” म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हा लेख वाचकांना प्रेरणादायी ठरावा)

सद्गुरुचा महिमा अपरंपार आहे. त्याचे वर्णन करण्यास कबीरांसारख्या महान संतांनी सुद्धा असमर्थता व्यक्त करताना म्हटले आहे की, साऱ्या धरतीचा कागद केला, सगळ्या वनस्पतीची लेखणी केली आणि सात समुद्रांची शाई केली तरी सुद्धा गुरुचे गुणवर्णन होऊ शकणार नाही. तरी देखील भक्त आपल्या सद्गुरुचा महिमा, त्यांच्या उपकारांचे स्तवन करण्याचा आटोकाट प्रयास करीत असतात.
सद्गुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचे दिव्य आभायुक्त अद्भुत व्यक्तित्व आबालवृद्धांना समानरुपाने आकर्षित करीत राहिले. सद्गुरुदेवांच्या दर्शनाने हृदय गदगदून गेल्याच्या अतीव प्रेमभावनेने ओतप्रोत अशा भक्तिरचना गात देश-विदेशातील भक्तगण सद्गुरुच्या प्रति आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती करीत असत. गुरुदेवांच्या दर्शनाची एक झलक किंवा त्यांचे हलकेसे स्मित सुद्धा भक्तांची हृदये तृप्त करुन टाकत.
बाबा हरदेवसिंहजी यांचा जन्म 23 फेब्रुवारी, 1954 रोजी संत निरंकारी कॉलनी, दिल्ली येथे झाला. माता कुलवंत कौरजी आणि पिता बाबा गुरबचनसिंहजी यांचे अलोट प्रेम तर त्यांना मिळालेच, शिवाय शहनशाह बाबा अवतारसिंहजी आणि जगतमाता बुद्धवंतीजी यांच्याही मायेची पाखर त्यांना लाभली ज्यामुळे त्यांचे व्यक्तित्व आणखी उज्वल बनत गेले. दिल्लीतील रेडिओ कॉलनीमधील रोजरी पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले तर पटियाला येथील यादवेंद्र पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांचे उच्च शिक्षण दिल्ली विद्यापीठामध्ये पूर्ण झाले.
अत्यंत विनम्र आणि शांत स्वभावाचे गुरुदेव हरदेव युवावर्गात अत्यंत लोकप्रिय होते. सद्गुरुरुपात प्रकट होण्यापूर्वी त्यांनी सेवादलाची वर्दी घालून अनेक प्रकारच्या व्यवस्था सांभाळण्यात सक्रीय योगदान दिले. 14 नोव्हेंबर, 1975 रोजी त्यांच्या विवाह पूज्य सविंदरजी यांच्याशी झाला.
24 एप्रिल, 1980 रोजी काही भ्रमित चित्ताच्या कट्टरपंथियांनी बाबा हरदेवसिंहजींचे वडील तथा तत्कालीन सद्गुरु बाबा गुरबचनसिंहजी यांच्यावर भ्याड हल्ला करुन त्यांना शहीद केले. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण निरंकारी जगताला हादरवून टाकले. बाबा हरदेवसिंहजी यांचा जीवनप्रवाहही या घटनेने बदलून टाकला. अत्यंत विषम अशा त्या परिस्थितीमध्ये निरंकारी मिशनला एका खंबीर नेतृत्वाची गरज होती. त्याच वेळी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी मिशनची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. सर्वप्रथम बाबा हरदेवसिंहजींनी निरंकारी भक्तांच्या हृदयातील आक्रोश शांत केला. रक्तपात करण्याऐवजी रक्तदान करण्याचा निर्देश देऊन कोणाबद्दलही मनामध्ये बदल्याची भावना न बाळगण्याची शिकवण दिली. आज निरंकारी मिशन विश्वातील एक अग्रगण्य रक्तदान करणारी संस्था बनले आहे यचे श्रेय बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या कुशल, दूरदृष्टीपूर्ण आणि दैवी नेतृत्वाला जाते. दिल्लीमध्ये निरंकारी सरोवर कॉम्प्लेक्सचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुशोभिकरण, तेथील दिव्य यात्रा (Journey Divine) नांवाचे संग्रहालय आणि मानव एकतेची साक्ष देणारा ‘एकत्व’ नांवाचा फवारा हे बाबाजींच्या कलात्मक मार्गदर्शनाचे अत्युत्कृष्ट नमुने आहेत.
सद्गुरु ब्रह्मज्ञानरुपी अनमोल देणगी देऊन जगाला सुखी करतात. संत कबीरजींचे वचन आहे की-
गुरु समान दाता नहीं, याचक शिष्य समान |
तीन लोक की सम्पदा, सो गुरु दीन्हों दान |
जगामध्ये ज्ञानासारखी परमपावन दुसरी वस्तु नाही. सद्गुरु ज्ञानरुपी नौकेमध्ये बसवून पाप्याहूनही पापी जीवाला भवसागरातून पार नेतात. जगामध्ये सद्गुरुहून अधिक दयाळु कोणी असू शकत नाही. श्रीमद्भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की, अर्जुना तू ज्ञानदृष्टीने सच्चिदानंदघन अशा मज परमात्म्याला पहा – अपि चेदसि पापेभ्य: सर्वेभ्य: पापकृत्तम: | सर्व ज्ञानप्लावेनैव वृजिन: सन्तरिष्यसि: | (गीता-4/36) अर्थात जरी तू पाप्यांहूनही पापी असलास तरी ज्ञानरुपी नौकेद्वारे नि:संदेह भवसागरातून तरुन जाशील.
संत महात्म्यांनी सद्गुरुची जात विचारु नये असे म्हटले आहे. महत्व तलवारीला असते, म्यानाला नाही. तद्वत सद्गुरु जातीपातीच्या पलिकडे असून निर्मळ अशा मानवी मनामध्ये निवास करीत असतात. मानवाने त्याचाच आश्रय घ्यायला हवा. संत निरंकारी मिशन हे एक सार्वभौमिक मिशन आहे, सर्वांचे मिशन आहे. मानवतेचे मिशन आहे. अनेकतेत एकतेचे हे मिशन आहे.
सद्गुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज स्वभावत:च मितभाषी होते. त्यांचे भोजन अल्प होते; मात्र निरंतर कार्यमग्न राहून ते सर्वाधिक कार्य करीत असत. वर्षातील तीन चतुर्थांश दिवस ते जगभरात कल्याणयात्रांवरच असत. त्यांच्या कल्याणयात्रांचा जास्तीत जास्त प्रवास सड़क मार्गाने व्हायचा. तथापि, त्यांच्या चेहऱ्यावर थकवा किंवा असहजतचा लवलेशही कधी आढळला नाही. त्यांच्या दर्शनाने भक्तगणांना नवी ऊर्जा लाभे. साधे जीवन उच्च विचार ही प्रेरणा देऊन मानवमात्राच्या प्रति कल्याणाची भावना व निराकार परमात्म्याच्या प्रति समर्पित होऊन जीवनप्रवास करण्याचे मार्गदर्शन बाबाजींकडून मानवजातीला मिळत राहिले.
16 नोव्हेंबर, 2013 रोजी संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेल्या ‘आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिवसाच्या’ प्रसंगी दिल्लीमध्ये मिशनच्या वतीने आयोजित केलेल्या मोटारसायकल रॅलीला संबोधित करताना बाबाजींनी हजारो भाविक-भक्तगणांना सहनशीलता धारण करण्याची प्रेरणा दिली. आज मनुष्य ज्या प्रकारचे जीवन जगत आहे त्यामध्ये प्रेम, करुणा आणि सहनशीलतेचा अभाव असल्याचे सांगून बाबाजींनी संकुचितपणा व स्वार्थाने भरलेल्या जगात सर्वांनी सहनशीलतेचा अंगिकारण्याचा आग्रह केला.
सहनशीलता असो किंवा मानवी मूल्यांचे अध:पतन. ज्या ज्या कमतरतांकडे बाबाजींनी निर्देश केला त्या दूर करण्यासाठी ते सातत्याने प्रयासरत राहिले. अद्वैत भावनेने युक्त होण्यासाठी ‘एकत्व’ अंगिकारण्याची प्रेरणा बाबाजींनी निरंतर दिली. ‘एकत्व’ हा मुख्य विषय समोर ठेवून सन 2012 मध्ये यु.के.मध्ये आयेाजित केलेल्या आंतरराष्ट्रीय संत समागमामध्ये बाबाजींनी अखिल मानवजातीला एकत्वाच्या धाग्यात गुंफण्याचा संदेश दिला.
प्रत्येक मानवाने या दिव्य विभुतीकडून प्राप्त शिकवणूकीने उपकृत होऊन श्रेष्ठ मानवी जीवन जगण्याची आज नितांत गरज आहे.
-----------------

10
1172 views