logo

निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या कल्पनेतील संत निरंकारी मिशन

निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या कल्पनेतील
संत निरंकारी मिशन
कृपा सागर

(निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या दिव्य जीवनातून प्रेरणा प्राप्त करण्यासाठी दरवर्षी 13 मे हा दिवस संत निरंकारी मिशनच्या वतीने जगभर “समर्पण दिवस” म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हा लेख वाचकांना प्रेरणादायी ठरावा)

ऐतिहासिक दृष्टीकोनातून प्रत्येक वर्ष प्रत्येक संस्थेसाठी महत्वपूर्ण असते; परंतु संत निरंकारी मिशनच्या इतिहासात 2016 हे वर्ष अतिविशेष बनून गेले आहे. यावर्षी 13 मे रोजी सद्गुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज आपल्या नश्वर देहाचा त्याग करुन निराकार परमात्म्यामध्ये लीन झाले आणि त्याबरोबरच 36 वर्षांच्या एका महान युगाचा अंत झाला. बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी संत निरंकारी मिशनला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वर काढले आणि सत्य, प्रेम, शांती व सहनशीलता अशा दिव्य मानवीय गुणांनी युक्त विश्वव्यापी आध्यात्मिक विचारधारेचे रुप प्रदान केले.
आपण जेव्हा बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्वप्नातील संत निरंकारी मिशनची कल्पना करतो तेव्हा आढळून येते की, त्यांनी आपल्या कार्यकाळात त्या महान सिद्धांतांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आपल्या जीवनचर्येचा प्रत्येक क्षण समर्पित केला होता जे त्यांना या मिशनचे संस्थापक बाबा बूटासिंहजी, शहनशाह बाबा अवतारसिंहजी आणि बाबा गुरबचनसिंहजी यांच्याकडून प्राप्त झाले होते. त्यांनी या मिशनच्या मुलभूत रचनेमध्ये किंवा त्याच्या हेतुमध्ये कोणताही बदल केला नाही. बाबा हरदेवसिंहजी महाराजांनीही मिशनचा तोच मुलभूत संदेश प्रसारित केला जो सर्वशक्तिमान परमात्म्याला जाणून त्याची भक्ती करण्याचा होता. जेव्हा आम्हाला परमात्म्याच्या वास्तविक स्वरुपाचा बोध होतो आणि आम्हाला हे समजते की, वेगवेगळ्या नावांनी विभिन्न धर्मांमध्ये ज्याची पूजा-अर्चा केली जाते तो परमात्मा एकच आहे, त्यामुळे आमच्या मनातील परमात्म्याच्या नामावरुन असलेले भ्रम आणि संघर्ष समाप्त होतात. सर्वच गुरु-पीर-पैगंबरांवर आपण प्रेम करु लागतो आणि सर्व धर्मग्रंथांबद्दल आमच्या मनात आस्था निर्माण होते.
बाबाजींच्या कथनानुसार जेव्हा आम्हाला हे समजते की, परमात्मा एकच आहे तेव्हा याही गोष्टीची जाणीव होते की, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये विद्यमान असलेला आत्मा हाही परमात्म्याचाच अंश होय आणि त्या नात्याने आपण सारे एक आहोत. अशाप्रकारे मानवा-मानवाच्या दरम्यान जात, धर्म, भाषा, वेशभूषा, आहार किंवा प्रांत यांवरुन जे भेदभाव आहेत ते समाप्त होतात आणि मानव एकता प्रस्थापित होऊ लागते.
हीच भावना पुढे नेण्यासाठी बाबाजींनी वेळोवेळी आपल्या संदेशाला “विश्वबंधुत्व”, “एकत्व”, “सद्भावपूर्ण एकत्व”, “भिंतीविरहित जग” अशी वेगवेगळी रुपं दिली. बाबाजींचा सर्वात महत्वपूर्ण संदेश होता – “एकाला जाणा, एकाला माना, एक व्हा” हा होता.
जेव्हा बाबाजींनी विदेशांमध्ये प्रचार-प्रसार करायला सुरवात केली तेव्हा तिथे त्यांनी हेच सांगितले की, मी तेच अभियान पुढे चालवत आहे जे 1967 साली बाबा गुरबचनसिंहजींनी सुरु केले होते. प्रबंध व्यवस्थेचा विस्तार केला असला तरी मूळ रचना बाबा गुरबचनसिंहजींनी तयार केली होती तशीच ठेवली. त्यावेळी 17 देशांमध्ये पसरलेले मिशन बाबा हरदेवसिंहजींच्या काळात जगभरातील प्रत्येक महाद्वीपामध्ये पोचले असून आज एकंदर 60 देशांमध्ये मिशनची व्याप्ती आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संत समागम, युवा संमेलने, सत्संग कार्यक्रम, समाजसेवा, विभिन्न धार्मिक तसेच आध्यात्मिक संस्थांसमवेत समन्वय अशा स्वरुपाचे त्यांचे कार्य होते ज्यामध्ये प्रामुख्याने अनेक देशांच्या सरकारकडून तसेच संयुक्त राष्ट्रांकडून मिशनला मान्यता मिळालेली आहे ही बाब ठळक उल्लेखनीय आहे. ज्ञात असावे की, संयुक्त राष्ट्र संघाने मिशनला त्यांच्या सामाजिक व आर्थिक परिषदेवर जनरल सल्लागाराचा दर्जा दिलेला आहे.
तेव्हा बाबाजींचे जे स्वप्न होते ते समजून घेण्यामध्ये आम्हाला अडचण भासू नये जे त्यांनी भारताबाहेर मिशनला प्रस्थापित करताना पाहिले होते. बाबाजींनी जगासमोर एक नवा दृष्टीकोन मांडला आहे. दोन देशांना विभाजित करणारी प्रत्येक रेखा ही खरं तर त्या दोन देशांना जोडणारी रेषा आहे. द्वेषाच्या भिंती पाडून प्रेमाचे पुल उभारता येतील असा हा नवा दृष्टीकोन बाबाजींनी दिला आहे.
बाबाजी संत निरंकारी मिशनला जगासमोर एक आदर्श म्हणून प्रस्तुत करु इच्छित होते. म्हणूनच बाबा अवतारसिंहजी आणि बाबा गुरबचनसिंहजी यांनी सुरु केलेल्या निरंकारी सरोवर परिसराचा जेव्हा विस्तार केला तेव्हा “दिव्य यात्रा” संग्रहालय आणि “एकत्व” फवारा यांची निर्मिती करुन मिशनला अशी स्मृतीचिन्हे प्रदान केली जिथे प्रत्येक आगंतुक, पर्यटक भेट देऊन आधी ईश्वराची जाणकारी प्राप्त करण्याची इच्छा व्यक्त करील आणि त्यानंतर मानवतेच्या सेवेसाठी प्रेरित होईल. विविध चिकित्सालये, विद्यालये, सिलाई व एम्ब्रॉयडरी प्रशिक्षण केंद्रे सकळ मानवमात्राच्या सेवेसाठी समर्पित आहेत आणि ती परमात्म्याच्या भक्तीचे प्रतीक बनले आहेत. सफाई अभियान आणि वृक्षारोपणाच्या प्रति जागृती प्रदान करताना त्यांनी मनातील प्रदूषण परमात्म्याच्या ज्ञानाने दूर केले जाऊ शकते आणि बाह्य प्रदूषण मानवतेच्या सेवेने दूर होऊ शकते असे सांगितले. या सेवा ईश्वरीय पूजेचेच रुप होत. अशाचप्रकारे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वेच्छेने मदतकार्य करणे व मानवतेच्या प्रति जागरुक करणे हाही त्यांचा मुख्य उद्देश होता.
बाबा गुरबचनसिंहजींप्रमाणेच बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी मिशनच्या अधिकाधिक शाखा व भवनांची निर्मिती केली ज्यायोगे परमात्म्याच्या ज्ञानाचा हा उजेड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकेल आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून अज्ञानरुपी अंधार नाहीसा होईल. मिशनच्या यापूर्वीच्या मार्गदर्शंकाप्रमाणेच बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनीही मिशनचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रत्येक संधीचा भरपूर लाभ उठवला. मिशनचा स्वत:चा असा कोणताही धार्मिक सण-उत्सव नाही. तथापि, अशा सण-उत्सवांच्या समयी बाबाजी परमात्म्याचा बोध, सत्य, प्रेम, शांती व सहनशीलतेचा प्रचार करण्यासाठी सदैव तत्पर राहत असत. दीपावलीच्या प्रसंगी ब्रह्मज्ञानाच्या प्रकाशाविषयी संदेश देत असत तर होळीच्या वेळी बेरंग प्रभुच्या रंगात रंगण्याविषयी प्रेरणा देत असत. ख्रिसमसच्या वेळी भगवान येशूंचे आपल्या विरोधकांच्या प्रतिही दया, करुणा व्यक्त करणे तसेच सत्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणे या बाबींची चर्चा करत.
अशाप्रकारे या निष्कर्षाप्रत पोचता येते की बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्वप्नातील मिशन तेच आहे जे त्यांच्या पूर्वसुरींनी स्थापित केले होते. मिशन ब्रह्मज्ञान व मानवीय मूल्यांचा प्रसार करण्यासाठी कोणताही मंच, संधी किंवा साधनांचा प्रयोग करु शकते. असे प्रत्येक कारण ते दूर करु इच्छित होते जे आम्हाला अज्ञानरुपी अंधार अथवा अनावश्यक कर्मकांड व अंधविश्वासाकडे घेऊन जाणारे असेल आणि मिशनने सुरवातीपासूनच तसा प्रयास केलेला होता, हे नि:संदेह होय.
------------

4
1563 views