‘डीजे’ च्या दणदणाटामुळे तीन जणांचा मृत्यू...........
‘डीजे’ च्या दणदणाटामुळे तीन जणांचा मृत्यू............
सांगलीत २, तर पुण्यात १ गोंगाट बळी
मुंबई: मोठ्या आवाजात डीजे लावायला बंदी असली तरी अलीकडे सण-उत्सवात पुन्हा डीजेचा दणदणाट ऐकायला मिळतो. त्यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण केवळ त्रासदायकच नव्हे, तर जीवघेणेही ठरत आहे. डीजेच्या दणदणाटी आवाजामुळे त्रास होऊन सांगलीत २ आणि पुण्यात एक तरुण मरण पावला.
विसर्जनाची मिरवणूक बघायला गेलेल्या कवठेएकंद (ता. तासगाव) येथील शेखर सुखदेव पावशे (वय ३२) याचा आवाज सहन न झाल्याने हृदयाचे ठोके बंद पडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली. दरम्यान, दुसरी घटना वाळवा तालुक्यातील दुधारी येथे घडली. प्रवीण शिरतोडे (वय ३५) असे डीजेच्या आवाजामुळे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
शेखर सुखदेव पावशे याच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली असतानाही तो गावात सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीत गेला. मिरवणुकीत डीजे लावण्यात आला होता. या मिरवणुकीत तो सहभागी झाला होता. दरम्यान, विसर्जन मिरवणुकीतून रात्री १० च्या सुमारास जात असताना मोठ्या आवाजामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले. बसस्थानक परिसरात जाईपर्यंत त्याचा त्रास अचानक वाढला. दरम्यान घरी येताच तो चक्कर येऊन पडला. त्याच्या छातीत वेदना होत असल्याचे त्याने सांगितल्याने त्याला तातडीने तासगावला खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सेंट्रिंग व्यावसायीक प्रवीण यशवंत शिरतोडे सोमवारी काम करून घरी आला. यानंतर तो गावातील विसर्जन मिरवणुकीत गेला.या ठिकाणी देखील डीजेचा मोठा दणदणाट सुरू होता. या आवाजात तो त्याच्या मित्रांसोबत नाचत होता. दरम्यान, त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि तो चक्कर येऊन पडला. त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने दवाखान्यात नेले. मात्र, उपचारपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, पुण्यात हिंजवडीतील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला.
योगेश अभिमन्यू साखरे (वय २३, रा.मारुती मंदिरासमोर, हिंजवडी गावठाण) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी हिंजवडीतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन झाले. योगेश हा हनुमान तालीम मित्र मंडळाचा कार्यकर्ता होता. मिरवणुकीमध्ये नृत्य करताना डीजेच्या आवाजाने त्याला चक्कर आली, असे सांगितले जाते. पोलिसांनी मात्र डीजेच्या आवाजामुळे त्याचा बळी गेलेला नाही असा दावा केला.
दरम्यान, मे महिन्यात श्रीगोंदा तालुक्यातील (जिल्हा नगर) एका शिक्षकाला डीजेच्या आवाजामुळे जीव गमवावा लागला. हनुमान जयंतीच्या मिरवणुकीतील डीजेच्या आवाजामुळे त्रास झाल्याने अशोक बाबूराव खंडागळे (५८)हे शिक्षक कोमात गेले नंतर मरण पावले.