logo
(Trust Registration No. 393)
अपने विचार लिखें....


निरंकारी सद्गुरुंच्या दिव्य आगमनाचे औचित्य साधून
सांगलीमध्ये विशाल निरंकारी संत समागम संपन्न
स्थिर परमात्म्याशी नाते जोडल्यानेच जीवनात स्थिरता येईल
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज
सांगली, १८ मार्च, २०२३: ”स्थिर परमात्म्याशी नाते जोडल्यानेच जीवनात आपोआपच स्थिरतेचा भाव उत्पन्न होतो.” असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी सांगलीच्या नियोजित एअरपोर्टच्या मैदानावर आयोजित एक दिवसीय निरंकारी संत समागमामध्ये उपस्थित विशाल मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले.
या समागमात सांगली व कोल्हापुरसह आजुबाजुच्या जिल्ह्यांतून तसेच निकटवर्ती कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांतून हजारोंच्या संख्येने मानव परिवार सहभागी झाला होता.
सद्गुरु माताजींनी सांगितले, की परमात्मा शांतस्वरूप, सर्वव्यापी व शाश्वत आहे. त्यामुळे त्याच्याशी नाते जोडणाऱ्याच्या जीवनात स्वाभाविकपणेच शांती व स्थिरता येते. याउलट अस्थिर मायेशी नाते जोडणाऱ्याच्या जीवनात चंचलता कायम राहते. परमात्म्याचा बोध प्राप्त करुन त्याच्याशी एकरुपता साधणाऱ्यालाच खऱ्या अर्थाने भक्त म्हटले जाते. त्याच्या संत स्वभावातूनच तो प्रभुभक्त आहे याची जाणीव होते.
सद्गुरु माताजींनी ब्रह्मज्ञानाच्या दिव्यतेविषयी प्रतिपादन करताना सांगितले, की ब्रह्मज्ञानाद्वारे ईश्वराची ओळख करुन त्याच्या अनुभूतीमध्ये जीवन जगल्याने आपली कर्मे सुंदर बनतात, आपली बुद्धी विपरीत दिशेला जात नाही आणि एक यथार्थ मनुष्य होण्याकडे आपला जीवनप्रवास होऊ लागतो. ज्याप्रमाणे साखर गोड आहे हे माहित असले आणि साखर आपल्या समोर ठेवली तरीही ती चाखून पाहिल्याशिवाय आपल्याला तिची गोडी कळत नाही तद्वत परमात्म्याला जाणल्यानंतर त्याची अनुभूती घेतल्यानेच आपल्याला भक्तीची गोडी कळते.
शेवटी, सद्गुरु माताजी म्हणाल्या, की भक्तांची हृदये परोपकारी असतात. आपले सुंदर आचरण व सेवा याद्वारे या धरतीला आणखी सुंदर बनविण्याचा त्यांचा प्रयास असतो. याच भावनेने ते आध्यात्मिक ज्ञानाने आपले अंत:करण उज्ज्वल करतात आणि बाह्य प्रकृतीच्या सुंदरतेसाठी पर्यावरणाची स्वच्छता व रक्षण करण्यासाठी स्वच्छ जल-स्वच्छ मन तसेच वृक्षारोपण यांसारखे उपक्रम राबवतात. शिवाय रक्तदानासारखे उपक्रम राबवून मानवमात्राच्या निष्काम सेवेमध्ये आपले योगदान देतात. सर्वांचे असेच सुंदर जीवन बनावे.
तत्पूर्वी संत समागमाच्या कार्यक्रमा दरम्यान विद्वान वक्ता, गीतकार व कवी सज्जनांनी त्यांचे विचार, गीत, कविता इत्यादी माध्यमांतून सत्यप्राप्तीसाठी प्रेरणादायी भाव व्यक्त केले. समागमामध्ये अनेक मान्यवर व्यक्तींनी सहभागी होऊन सद्गुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी या दिव्य युगुलाचे आशीर्वाद प्राप्त केले.
सांगलीमध्ये आयोजित या संत समागमात श्री जालिंदर जाधव जी (संयोजक, सांगली) यांनी समस्त भाविक-भक्तगणांच्या वतीने सद्गुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी यांचे हार्दिक आभार व्यक्त केले आणि स्थानिक प्रशासन व इतर सरकारी यंत्रणांना त्यांच्या बहुमोल सहकार्याबद्दल धन्यवाद .

203
10918 views
  
1 shares