logo

आत्मिकते संगे मानवतेच्या रंगांचे दर्शन घडविणाऱ्या भव्य शोभा यात्रेने महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमच

आत्मिकते संगे मानवतेच्या रंगांचे दर्शन घडविणाऱ्या भव्य शोभा यात्रेने
महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमचा भव्य शुभारंभ

मानव आहोत तर मानवी गुणांचा अंगीकार करु या
निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

औरंगाबाद 27 जानेवारी, 2023: “या जगात आपण मानव म्हणून जन्माला आलो आहोत तर मानवी गुणांचा अंगीकार करु या आणि यथार्थ मानव बनून जीवन जगू या.” असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमामध्ये मानवतेच्या नांवे प्रेषित केलेल्या आपल्या संदेशामध्ये व्यक्त केले.
औरंगाबादच्या बिडकीन डीएमआयसी परिसरात सुमारे 300 एकर मैदानावर आयोजित या तीन दिवसीय विशाल निरंकारी संत समागमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि देशाच्या विविध भागांतून लाखोंच्या संख्येने जनसागर लोटला आहे. विदेशातूनही शेकडो भक्त या समागमामध्ये सहभागी झाले आहेत.
सद्गुरु माताजी म्हणाल्या, की ज्या परमात्म्याने या सृष्टीची रचना केली आहे त्याचाच अंश प्रत्येक मानवामध्ये आत्म्याच्या रूपात विद्यमान आहे. मनुष्य जेव्हा परमात्म्याला जाणून घेतो तेव्हा त्याला प्रत्येकामध्ये परमात्म्याला पाहण्याची दृष्टी प्राप्त होते. त्याच्या मनात एकत्वाचा भाव उत्पन्न होतो. मग तो आहार, वेशभूषा, उच्च-नीच, जाती-पाती इत्यादीतील विभिन्नतेमुळे कोणाचा द्वेष करत नाही. | त्याच्या मनातील द्वेषाच्या भिंती जमिनदोस्त होऊन प्रेमाचे पुल निर्माण होतात. मनामध्ये जेव्हा ईश्वराचा निवास होतो तेव्हा सर्व गोष्टी आध्यात्मिकतेने युक्त होतात. परमात्म्याच्या जाणीवेमध्ये केलेली प्रत्येक गोष्ट आपसुकच मानवतेने युक्त होते.
शोभायात्रा
तत्पूर्वी आज सकाळी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) अंतर्गत मार्गावर आयोजित केलेल्या भव्य शोभा यात्रेने या संत समागमाचा प्रारंभ झाला. या शोभायात्रेमध्ये सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी हे दिव्य युगुल एका फुलांनी सुशोभित खुल्या वाहनामध्ये विराजमान राहून शोभायात्रेद्वारे त्यांच्या समोरुन जाणाऱ्या भक्तगणांचे अभिवादन स्वीकारत त्यांना आशीर्वाद प्रदान करत होते.
या शोभायात्रेमध्ये श्रद्धा, भक्ती, प्रेमाच्या अलौकिक भावनांनी युक्त होऊन आपापल्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवत भाविक-भक्तगण मानवतेच्या रंगांचे दर्शन घडवताना दिसत होते. त्यामध्ये वाशिममधून पावली नृत्य, अकोला व कोटारी आंध्र प्रदेश येथून बंजारा नृत्य, शहापूर येथून तारपा नृत्य, मुंबई, महाड व सावरगांव येथून लेझिम, राळेगणसिद्धी व कळंबोली येथून दिंडी, जामखेड येथून समूह नृत्य, शिवडी (मुंबई) व कोपरखैरणे (नवी मुंबई) येथून वारकरी, चिपळूणमधून ढोल पथक, विट्ठलवाडी येथून समूह नृत्य, महाड येथून आदिवासी नृत्य, दापोली व पालघर येथून कोळी नृत्य, कराडमधून धनगरी गजनृत्य, चारोटी येथून तारपा नृत्य इत्यादिंचरा समावेश होता.
शोभा यात्रेच्या अंतिम टप्प्यात स्वयं सद्गुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी त्यामध्ये सहभागी झाले. शोभा यात्रा समागमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर येताच समागम समितीच्या सदस्यांनी समस्त साध संगतच्या वतीने या दिव्य युगुलाचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले. त्यानंतर समागम समितीचे सदस्य आणि मिशनचे अन्य अधिकारी यांनी दिव्य युगुलाला समागम पंडालमधून मुख्य मंचापर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांच्या पालखीचे नेतृत्व केले. या प्रसंगी पंडालमध्ये उपस्थित भक्तगण आपल्या हृदयसम्राट सद्गुरूला आपल्या दरम्यान पाहून हर्षभरित झाले आणि धन निरंकारचा जयघोष करत त्यांनी दिव्य युगुलाचे हार्दिक अभिनंदन व अभिवादन केले. अत्यानंदाने अनेक भक्तांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूच्या धारा प्रवाहित झाल्या.
महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक संत समागमाच्या निमित्ताने आज दुपारी संत निरंकारी मंडळाच्या प्रेस व पब्लिसिटी विभागाच्या मेंबर इंचार्ज पूज्य श्रीमती राजकुमारी यांच्या अध्यक्षतेखाली एक पत्रकार परिषद समागम स्थळावरच घेण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाच्या प्रतिनिधींनी समागमसंबंधी माहिती जाणून घेतली.

185
17266 views
  
2 shares