logo

प्रेम व एकोप्याच्या भावनेत सर्वांचे कल्याण निहित सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंका

प्रेम व एकोप्याच्या भावनेत सर्वांचे कल्याण निहित
सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज
महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमानिमित्त विशेष लेख. हा संत समागम २७, २८ व २९ जानेवारी, २०२३ रोजी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात डीएमआयसी मैदान, बिडकीन, पैठण रोड, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे.


संतांनी आपल्या दिव्य वाणीमध्ये सदोदित हाच संदेश दिला आहे, की प्रेम व एकोप्याच्या भावनेत सर्वांचे कल्याण निहित असते. ज्याप्रमाणे एखाद्या भांड्यात विशिष्ट वस्तू ठेवली असेल तर त्यातून तीच वस्तू आपल्याला प्राप्त होईल. उदा. एखाद्या भांड्यात आपण दूध ठेवले असेल तर तिथून दूधच मिळेल, एखादा आंबट पदार्थ ठेवला असेल तर तो मिळेल, गोड पदार्थ असेल तर तोच मिळू शकेल. तात्पर्य, आपण आपल्या मनरुपी भांड्यामध्ये काय साठवले आहे ते आपल्या व्यवहारावर आणि आचरणावर अवलंबून आहे. जर आपल्या अंतर्मनात, आमच्या विचारांमध्ये अहंकाराची भावना असेल तर आपण वेळूप्रमाणे असू जे केवळ एकमेकांशी टक्कर घेत राहतात. यासाठी आपल्या स्वभावात नम्रता असणे नितांत गरजेचे आहे. आपल्यामध्ये जर विनम्रता नसेल तर आपण कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला जुळवून घेऊ शकणार नाही. त्यामुळे अकारण असह्य पीडा सहन करत जीवन जगत राहावे लागेल. यास्तव स्वभावामध्ये सदैव नम्रता व कोमलतेची भावना असायला हवी.
बहुधा आपण असे पाहतो, की एका दगडावर दुसरा दगड रगडला तर त्यातून ठिणगी बाहेर पडते. माणसाच्या बाबतीतदेखील असेच काहीतरी घडते. जेव्हा तो नकारात्मकतेची, दुष्ट विचारांची ठिणगी मनामध्ये बाळगतो तेव्हा तिला जागृत व्हायला केवळ एक हवेचा झोका पुरेसा आहे, लगेचच ती ठिणगी विशाल अग्निचे रूप धारण करते ज्यामध्ये आपले मस्तक होरपळून स्वत:चेच नुकसान करुन बसते. याकरिता प्रयत्न हाच करायचा आहे, की अशी नकारात्मक ठिणगी उत्पन्नच होऊ नये जिच्या प्रभावामुळे आपण आपसात भिडले जाऊ. आमचा स्वभाव शांत असावा. मनामध्ये कोणाच्याही बाबतीत अढी निर्माण होऊ नये ज्यामुळे आपले किंवा दुसऱ्याचेही नुकसान होणार नाही. जसे संपूर्ण हरदेव बाणीमध्ये म्हटले आहे, की-
हर जाति हर वेश के बन्दे सदा प्यार से रह पायें।
मानवता का भला इसी में आपस में न टकरायें।
खरं तर आपण सर्व एकाच परमपिता परमात्म्याची लेकरं आहोत. असे असताना मनामध्ये परस्परांमध्ये वैर-ईर्षेची भावना उत्पन्न होण्याचे कारणच उरत नाही. आपण स्वत:मध्ये सुधारणा घडवत या जगामध्ये सुंदर प्रकारे विचरण करु तर निश्चितच हे जग सुधरेल. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण याची सुरवात स्वत:पासून करु. संसारामध्ये राहत असताना आपले हे कर्तव्य आहे, की आपण श्रेष्ठ मार्ग निवडावा आणि सन्मार्गावर चालत राहून आपले जीवन सार्थक करावे.
----------------

24
19618 views
  
1 shares