logo

धरतीला सावरण्याची जबाबदारी मानवाची सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमा

धरतीला सावरण्याची जबाबदारी मानवाची
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज
महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमानिमित्त विशेष लेख. हा संत समागम २७, २८ व २९ जानेवारी, २०२३ रोजी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात डीएमआयसी मैदान, बिडकीन, पैठण रोड, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे.


ईश्वराने धरतीची निर्मिती केवढीतरी सुंदर केलेली आहे; परंतु मानवाचा व्यवहारच मानवता विरहित झाला आहे. मनुष्य या सुंदर धरतीचा विध्वंस करत चालला आहे. खरं तर या धरतीला सावरण्याची जबाबदारी आम्हा मानवांचीच आहे. आपण आपल्या कर्मांद्वारे, आपल्या विचारांनी आणि आपल्या जीवनाद्वारे ही बाब ध्यानात ठेवायला हवी, की एखादी लहान-सहान गोष्टसुद्धा आपल्याकडून घडू नये जी या धरतीसाठी नुकसानकारक ठरेल. जसे एका शायरानेही म्हटले आहे, की-
लम्हों ने खता की है और सदियों ने सजा पाई है।
जर आपले कर्म आणि व्यवहार विपरीत दिशेने चाललेले असतील तर निश्चितपणे नुकसान होणार आहे, मग ते नुकसान आपले असो, समोरच्याचे असो, कोणाचेही, कोणत्याही रूपात असो. आपण स्वसुधार घडवून आणण्यावर लक्ष केंद्रीत करावे, सदोदित या परमात्म्याची जाणीव ठेवावी, क्षणोक्षणी त्याची भीती बाळगून जीवन व्यतीत करावे. या जाणीवेमध्ये राहिल्याने आपण जगाला सुंदर बनविण्यामध्ये आपले योगदान देऊ शकू. जेव्हा कोणी मनुष्य एखादे चांगले कार्य करत असेल तेव्हा आपल्या मनाला वाटते, की हे उत्तम कार्य आपण का करत आहोत आणि हे आपण कुठून शिकला? त्यानंतर आपणही ते सुंदर कार्य करण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारे जेव्हा आपण स्वत: चांगले काम करु लागू, स्वत:ला उत्तम मनुष्य बनवू तेव्हा प्रत्येकाला असे वाटू लागेल, की या व्यक्तीचे जीवन इतके सुंदर आहे, तिचे बोलणे गोड आहे, नेहमी इतरांच्या कामाला येते तेव्हा आपणही असे जीवन का न जगावे? मग तो मनुष्य जेव्हा जेव्हा भेटेल तेव्हा आम्हाला पुन्हा भेटण्याची इच्छा बाळगेल. हा मनुष्य चांगला नाही, याच्यापासून आपण दूर राहू असा विचार त्याच्या मनात चुकूनही येणार नाही. आपण स्वत: मनुष्य आहोत आणि ही निवड करण्याचा विकल्प जेवढा आपल्याजवळ आहे तेवढाच समोरच्याकडेही आहे. शरीरातील पाच तत्वांविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याच पाच तत्वापासून आपणही बनलो आहोत आणि तेही बनले आहेत.
ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने आमच्या जीवनात काय परिवर्तन होते हे ब्रह्मज्ञान प्राप्त केल्यानंतरच कळते. ही तीच दृष्टी आहे जी आपल्याला स्वत:ची ओळख करुन देते. स्वत:ची ओळख झाल्यानंतर आपल्याला हे अवगत झाले, की समोरच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणताही फरक नाही तेव्हा प्रेम करणे शक्य होईल, हृदयातून द्वेषभावना निघून जाईल, मनातून भेदभाव दूर होतील आणि उरेल केवळ प्रेम आणि प्रेमच.
आपण आपल्या जीवनामध्ये ते युग घेऊन यायचे आहे ज्याविषयी बोलले जाते, की ती पुरातन युगं फार चांगली होती आणि हे कलियुग चांगले नाही. खरं तर यामध्ये युगाची कोणतीच चूक नाही. चूक असेल तर ती मानवाची आहे. आपण आपले जीवन असे का न घडवावे ज्यायोगे आमच्यामनामध्ये रामराज्य येईल? आमच्या मनामध्ये हा ईश्यर अशा प्रकारे सामावून जायला हवा ज्यायोगे आपण मनामध्ये केवळ या निराकार प्रभूलाच वसवू, कोणत्याही दुष्ट भावनेला थारा देऊ नये, मनामध्ये विकार राहू देऊ नये.
ईश्वराने कृपा करावी आणि जसे संतांनी, गुरु-पीर-पैगंबरांनी अपेक्षित केले तसे सुंदर जीवन प्रत्येकाचे व्हावे. आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने मानव बनून जीवन जगावे. आपण स्वत:बरोबरच समाजाचे आणि अवघ्या विश्वाचे भले करावे.
-------

26
14683 views
  
1 shares