logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

चळवळीतील व्यवसायीकता हिंदीत एक वाक्प्रचार आहे. "सच बोलना भी कलियुग में एक बडी तपस्या है।" -सामाजिक कार्यकर्ते के. के.जामकर

नांदेड :

चळवळीतील व्यवसायीकता

हिंदीत एक वाक्प्रचार आहे. "सच बोलना भी कलियुग में एक बडी तपस्या है।" पुर्वी समाज फारसा सुशिक्षित जरी नसला तरी सुसंस्कारी व प्रामाणिक जरूर होता. म्हणून समाजघटकाच्या कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असतांना तो नेहमीच प्रामाणिक राहून समाज कार्य करत असे. लोक फारसे जरी शिकले सवरलेले नसले तरी परस्परांत सामाजिक सलोखा ठेऊन एकमेकांत आदराची भावना ठेवत. म्हणूनच वडीलधारी, अनुभवी, प्रामाणिक मंडळी जे सांगत होती ते शिरसावंद्य व आपल्या हिताचे आहे असे समजून सामान्य माणूस त्याचे अनुकरण करीत असे. हे करण्यामागे सर्वकाही समाज हिताचे व भल्याचे असायचे म्हणून सर्वसामान्य माणूस आपले हितचिंतक व मार्गदर्शक म्हणूनच वरिष्ठांकडे बघायचे. त्यांच्या उपदेशामध्ये भंपकपणा व व्यवसायीकता नसायची कारण वरिष्ठांनी केलेले मार्गदर्शन व सल्ले हे अनुभवी, निस्वार्थ असायचे. म्हणूनच तत्कालीन कुठल्याही चळवळीत या एकोप्याचे बळ दीर्घकाळ टिकायचे. वर्तमानात मात्र हे चित्र पुर्णपणे बदलून त्याचे व्यवसायात रुपांतर झालेले आहे. हि चळवळीसाठी धोक्याची घंटा आहे. अशा आवस्थेत चळवळी कमकुवत होऊन नामशेष होत आहेत. मात्र नेतृत्त्व करणारी कुणीही नेतेमंडळी याचे आत्मपरिक्षण करण्यास तयार नाहीत. उलटपक्षी माणूस बदलला, समाज बदलला सारखी कारणे देऊन जनसामान्यालाच दोष देतात. जनसामान्य माणूस हा आजही आपल्या हक्कासाठी व अन्याय-अत्याचार विरोधात लढण्यास तयार आहे. पण स्वार्थी व व्यवसायीक नेतृत्त्वामुळे तो डळमळीत अवस्थेत आहे. पुर्वीप्रमाणे प्रामाणिक, पारदर्शी राहून संवेदनशीलतेने विचार केल्यास जनसामान्य अशा नेतृत्ववार विश्वास ठेवुन वाटचाल करतो. हे मी माझ्या अनुभवाने सिद्ध करू शकतो. म्हणून नेतृत्त्व करणाऱ्या मंडळीमध्ये प्रामाणिक व पारदर्शीपणा असणे अत्यंत गरजेचे आहे. वर्तमानात असे अपवादानेच दिसते.



या बाबत मी माझे काही वास्तव अनुभव आपणासमोर ठेवतो. १९८० साली कामगार चळवळीच्या निमित्त्याने चळवळीत प्रवेश केला. माझ्या आईवडिलांची शिकवण व ज्यांच्यासोबत मी चळवीत कार्यरत होतो ती सर्वच मंडळी निस्वार्थ व प्रामाणिकपणे चळवळीत सक्रीय होती. अशा या आमच्या सर्वांच्या अभ्यासू व प्रामाणिकपणामुळे विविध व्यवस्थापनावर आमचे नैतिक वजन असल्याने बरेचसे प्रश्न चुटकी सारशी सुटायचे. त्यामूळे ज्या चळवळीचे नेतृत्त्व आम्ही करायचो त्या चळवळीतील सामान्य माणूस ही आनंदी राहून चळवीत सक्रिय असायचा. त्यांच्याकडून चळवळीचे दैनंदीन व्यवहार व गुजराणीसाठी आम्ही नाममात्र शुल्क घेत पण सामान्यांचे आर्थिक हित साध्य केले म्हणून कधीच त्यांच्याकडून टक्केवारी व भेट देखील स्वीकारत नसत. वर्तमानात प्रत्येक चळवळीत व्यवसायीकता व टक्केवारीचा बाजार थाटला आहे. म्हणून जनसामान्य ही निस्वार्थपणे चळवळीत फारसे कार्यरत राहण्याऐवजी टक्केवारी पुरतेच राहतात. अशा प्रकारची टक्केवारी घेऊन व्यवस्थापनाशी साटेलोटे ठेऊन जनसामान्यांचे प्रामाणिक हित साधण्याऐवजी "टक्केवारी नेतृत्त्व उदयास आले आहे हे वास्तव आहे." मी पुर्वी व वर्तमानात ज्या चळवळीत काम करत होतो त्यातील एक वास्तव अनुभव आपल्या समोर ठेवतो, तो असा. एका XYZ कामगाराला ३५ वर्षापुर्वी पन्नास ते साठ हजाराचा आर्थिक मोबदला मिळवून दिला, त्या काळी त्यांनी माझ्या जेष्ठ नेत्याला पाच ग्रॅम सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली. आमचे वरिष्ठ ऐवढे प्रामाणिक होते की, त्यांनी त्या अंगठीचा स्वीकारतर केलाच नाही उलट माझ्यावर एवढे रागावले व म्हणाले "असे धंदे करायचे असतील तर चळवळीतून निघून जा." त्यांच्या सांगण्याचा रोख असा होता पैसा व सोने जमा करण्यापेक्षा सोन्यासारखी माणसं गोळा करा व त्यांना कायम जपा. आज ते ग्रहस्थ सेवानिवृत्त होऊन 15 वर्षे झाली तरी आधून मधून माझ्या घरी येऊन माझ्या सुख-दु:खात सहभागी होतात आणि म्हणतात, तुमच्यासारखी माणसं आज भेटणं म्हणजे देवच भेटल्यागत आहे. यावरून मला असे वाटते ही झाली आपल्या प्रामाणिक कर्मकार्याची पावती. असे बरेचसे माणुसकीचे दर्शन घडवीणारे मी आजर्पंत वास्तवातून अनुभवले आहेत. म्हणून चळवळीत काम करणारी जी माणसे व नेतृत्त्व अभ्यासू व प्रामाणिक असते त्याच चळववी कधीच संपत नाहीत. वर्तमानात मी ज्या सामाजिक चळवळीत कार्यरत आहे तिथे विविध जाती धर्माचे लोक माझे सोबत राहून तन-मन-धनाने कार्यरत असतात, ते देखील सर्व असेच प्रामाणिक आहेत.

हे जग व हि दुनियादारी पुर्वीही प्रामाणिक व विश्वासार्हतेवर चालत होती व आजही चालत आहे. फक्त आपण स्वत: प्रामाणिक असणे अत्यंत गरजेचे आहे. जेथे निस्वार्थ सेवाभावी व प्रामाणिक नेतृत्त्व असते तेथे नक्कीच त्या चळवळीत अनेक वादळे व संकटाशी सामना करूनही आज ताठ मानेने उभ्या आहेत. पुर्वी वैद्यकीय व शिक्षण क्षेत्रात सेवाभावी वृत्ती होती आज त्याचे रुपांतर व्यवसायात झाल्यामूळे कामगार क्षेत्रासह ही सर्वच क्षेत्र मोठ्या प्रमाणावर बदनाम आहेत. सामान्य माणूस हा वेडा नाही, तो सत्याच्या शोधात असतो, एकदा का त्याला सत्य सापडले व ते अनुभवले की, तो सत्याच्या चळवळीची साथ कधीच सोडत नाही. म्हणून म्हणतात "सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजीत नही।" चळवळीत जेथे स्वार्थ व व्यावसायीकता येते तेव्हा त्या चळवळी रसातळाला जातात. भारतीय स्वातंत्र्याची, मराठवाडा मुक्ती संग्रामाची, तसेच संयुक्त महाराष्ट्र लढ्याची चळवळ अशी अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. जेथे निस्सीम त्याग, प्रामाणिकपणा व स्वाभिमान हे सर्व अलंकार ठेऊन या चळवळींची वाटचाल झाली आहे म्हणून या चळवळी दीर्घकाळ टिकल्या आणि यशस्वी झाल्या.



येणाऱ्या महाराष्ट्र व कामगार दिनाच्या निमित्ताने मला एक गोष्ट प्रखरतेने सांगाविशी वाटते की, वर्तमानातील चळवळीत त्याग, समर्पण, पारदर्शकता, प्रामाणिक व संवेदनशीला संपुष्टात आल्यामूळे सर्वत्र चळवळी बुडणाऱ्या जाहाजा सारख्या दिसत आहेत. म्हणून चळवळीतील नेतृत्त्वाने स्वार्थ व व्यावसायीकता सोडून कार्यरत असावे तरच हा इतिहास पुन्हा इतिहास म्हणून लिहिल्या जाईल. अन्यथा चळवळी व्यवसायीक व धंदेवाईक झाल्या हो असे समाज म्हणनारच. म्हणून हे वास्तव-सत्य आपणासमोर मांडत असतांना मला असे वाटते की, "सच बोलना भी कलियुग में एक बडी तपस्या है ।" कुणी हे विचार नाकारावेत अथवा स्वीकारावेत हा ज्याच्या त्याच्या विचारसरणी व कार्यकतृत्वाचा भाग आहे. म्हणूनच हे अनुभवलेले वास्तव प्रखरतेने आपल्या सर्वांसमोर ठेवले आहे. आपल्या देशाला व समाजाला त्याग, बलीदान व प्रामाणिक विचाराची परंपरा आणी वारसा आहे म्हणून म्हणावेसे वटते की, "चळवळीतील व्यवसायीकता सोडा समाज व माणसाशी नाते जोडा" या निमित्त्याने दोन ओळी आपल्या समोर ठेवतो त्या अशा "जो स्वत:साठी जगला तो खाक जगला व जो इतरांसाठी जगला तो लाख लाख जगला."



इन्कलाब जिंदाबाद ।

के. के. जांबकर

मो. ९४२२८७०५७८



26
917 views

Comment