तुळजापुरात अद्यावत वातानुकूलित नाट्यगृह उभारणार!
प्रतिनिधी:-विकास वाघ धाराशिव,
'पंचरंग करंडक' एकांकिका लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळ्यात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे प्रतिपादन
कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर शहराला लाभलेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध करण्यासाठी, तसेच स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे लवकरच सर्व सोयींनी युक्त असे पूर्णतः वातानुकूलित भव्य आणि अद्यावत नाट्यगृह उभारणार असल्याची अशी ग्वाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे तुळजापूर आणि परिसरातील नाट्य चळवळीला मोठी उभारी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
'पंचरंग प्रतिष्ठान' आयोजित 'श्री क्षेत्र तुळजापूर राज्यस्तरीय पंचरंग करंडक एकांकिका लेखन स्पर्धा २०२५-२६' चा पारितोषिक वितरण आणि निवडक एकांकिकांच्या "अंकुर" या संग्रहाचा प्रकाशन सोहळा हॉटेल स्कायलँड येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला आमदार पाटील यांनी ऑनलाईन माध्यमातून उपस्थित राहून नवोदित लेखकांच्या सृजनशीलतेचा गौरव केला. यावेळी बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, आई तुळजाभवानीच्या पावन भूमीत साहित्याचा जागर होणे ही अभिमानास्पद बाब आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने निवडक एकांकिका संहितांचा 'अंकुर' हा संग्रह पुस्तक स्वरूपात प्रकाशित करण्यात आला. नवोदित लेखकांना संधी उपलब्ध करून देऊन दर्जेदार नाट्य साहित्य रंगभूमीपर्यंत पोहोचवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तुळजापूरची ही साहित्यिक आणि सांस्कृतिक पताका अशीच उंच फडकत राहणार असल्याचे सांगत आमदार पाटील यांनी आयोजक, पंचरंग प्रतिष्ठानच्या कामाचे यावेळी कौतुकही केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख, ख्यातकीर्त सिने गीतकार तथा प्रसिद्ध कवी व नाट्य लेखक प्रा. डॉ. दासू वैद्य उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने सोहळ्याची उंची अधिकच वाढली. व्यासपीठावर तुळजापूरचे नगराध्यक्ष श्री. विनोद पिटू गंगणे, उपनगराध्यक्ष श्री. रामचंद्र आबा रोचकरी, प्रसिद्ध अभिनेते श्री. उमेश जगताप, श्री. शंतनू गंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी पंचरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत आप्पा नाडापुडे, सचिव प्रा. संभाजीराव भोसले, उपाध्यक्ष सचिन घोडके, स्पर्धा संयोजक महेश धुमाळ आणि दिग्विजय भोसले यांच्यासह नाट्य व साहित्य क्षेत्रातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व विजेत्या लेखकांचे आणि 'अंकुर' संग्रहात स्थान मिळवलेल्या साहित्याचे यावेळी मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात लौकिकस्पद कामगिरी बजावल्याबद्दल सरोजा नरेश अमृतराव, नीता दिनेश क्षीरसागर डॉ. शिवतेज संभाजी भोसले, डॉ. निविता नारायण नन्नवरे कु. सृष्टी धनंजय पाटील, प्रा. ऋतुजा अनिल रोचकरी, चि. कासिफ ख्वाजा सय्यद, श्री. स्वप्नील ऋषीकांत भोसले, डॉ. रिया राजेश शिंदे, कु. भक्ती सुधाकर उळेकर, चि. शिवतेज सुधाकर उळेकर, चि. तुषार तुळसीदास साखरे, कु. आदिती सचिन घोडके, चि. रुहान शंतनू गंगणे, कु. श्रुती राजेश चोपदार, चि. आयुष राजेश जगताप वरील सर्व मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात आला.