logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नांदेडमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार उघड ; श्रीनगर भागातून 10 सिलिंडर जप्त*


नांदेड दि. 16 मार्च : घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरची अवैध साठवणूक करून चढ्या दराने विक्री करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हा पुरवठा विभागाने श्रीनगर भागात धाड टाकून 10 रिकामे गॅस सिलिंडर जप्त केले असून संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हनुमान मंदिर रोड, श्रीनगर परिसरात राहणारे मकसूद अहमद हे आपल्या राहत्या घरी घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरचा अवैध साठा करून चढ्या दराने विक्री करत असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड व तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 12 मार्च 2026रोजी संबंधित ठिकाणी आकस्मिक तपासणी केली.
तपासणीदरम्यान पथकाला एकूण 10 रिकामे गॅस सिलिंडर आढळून आले. त्यामध्ये घरगुती वापराचे ७ सिलिंडर (एचपी-3, भारत गॅस-2, इंडेन-2) तर व्यावसायिक वापराचे ३ सिलिंडर (एचपी कंपनीचे) असे एकूण 10 रिकामे सिलेडर पंचासमक्ष जप्त करण्यात आले.
या प्रकरणात जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 च्या कलम 3 व 7 तसेच लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस (Restriction on Use and Fixation of Selling Price) आदेश, 2000 मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्याने निरीक्षण अधिकारी रवींद्र राठोड यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संबंधित आरोपीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईत निरीक्षण अधिकारी रवींद्र राठोड, मुंजाभाऊ लोकरे, बालाप्रसाद वल्लाकट्टी, वेदनेश्वर घावट (जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय) तसेच नवदीप जाधव आणि विश्वनाथ शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली.
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर किंवा अवैध साठवणूक करून सर्वसामान्यांची लूट करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशा प्रकारच्या अवैध कृत्यांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड यांनी केले आहे.

0
88 views

Comment