
आमदार तानाजी सावंतांनी केला महायुतीचा विश्वासघात - भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांचा हल्लाबोल
प्रतिनिधी:-विकास वाघ धाराशिव.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टीने संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात महायुती म्हणून लढण्याचे निश्चित झाले होते. मात्र, आमदार तानाजीराव सावंत यांनी भूम, परांडा आणि वाशी या मतदारसंघांत महायुतीशी विसंगत भूमिका घेतली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचे आदेश डावलून थेट काँग्रेस आणि 'उबाठा' गटाशी हातमिळवणी केली. महायुतीचा विश्वासघात करणाऱ्या सावंतांच्या या गंभीर कृत्याची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार केली असल्याचा हल्लाबोल भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केला आहे.
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा पाढाच वाचला. ते म्हणाले की, जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये महायुतीने पूर्ण ताकदीनिशी एकजुटीने निवडणूक लढवली. मात्र, सावंतांच्या आडमुठ्या धोरणामुळे भूम-परांडा-वाशी भागात युती होऊ शकली नाही. या गद्दारीबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळोवेळी अवगत केले आहे. मतांच्या आकडेवारीतून सावंतांची 'फिक्सिंग' उघड झाली आहे. आमदार सावंत यांनी केवळ युती नाकारली नाही, तर महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात रसद पुरवल्याचा दावाही कुलकर्णी यांनी केला आहे. पुराव्यादाखल त्यांनी लोकसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भूम-परंडा-वाशी तालुक्यातील मतांच्या फरकाकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. भूम-परांडा-वाशीतून उबाठाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना सुमारे दीड लाख मते मिळाली होती.
जिल्हा परिषद निवडणुकीत उबाठाच्या उमेदवारांना केवळ १५ हजार मते मिळाली आहेत. आमदार सावंतांनी त्यांची सगळी रसद लोकसभा निवडणुकीत उबाठाकडे वळवली व खासदार राजे निंबाळकर यांनी या निवडणुकीत त्यांची मते आमदार सावंतांच्या उमेदवाराकडे वळवली असल्याचा हा सगळ्यात मोठा पुरावा असून त्यांची छुपी युती व राजकीय वस्तुस्थिती आता जनतेसमोर उघडी पडली असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले.
विजयी सदस्यांना उपमुख्यमंत्री महोदयांपासून दूर ठेवले
निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या ८ सदस्यांना आमदार सावंतांनी शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नेण्याऐवजी स्वतःच्या ताब्यात ठेवले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आणि संशयास्पद आहे. पक्षांतर्गत शिस्तीचा भंग करणारी असल्याचेही कुलकर्णी यांनी पत्रात म्हटले आहे. या प्रकरणी वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार आणि कडक कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. महायुतीचा विश्वासघात करून विरोधकांना मदत करणाऱ्या सावंतांच्या भूमिकेची सविस्तर माहिती वरिष्ठ नेत्यांना देण्यात आली आहे. महायुतीतील कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून, जिल्ह्यातील मतदारांचा महायुतीवर असलेला विश्वास टिकवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी त्वरीत कडक कारवाई करावी अशी आग्रही मागणीही दत्ता कुलकर्णी यांनी केली आहे. महायुतीची एकजूट टिकवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असा इशाराही त्यांनी शेवटी दिला.