logo

न्याय आपल्या दारी उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात येणार मोबाईल व्हॅन*


नांदेड, दि. 23 डिसेंबर :- ग्रामीण भागातील जनसामान्यांना न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचता यावे व त्यांनी न्यायापासून वंचित राहू नये याकरिता नांदेड जिल्हामध्ये ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेंतर्गत 3 जानेवारी 2026 ते 22 जानेवारी 2026 पर्यंत फिरते लोकअदालतीचे मोबाईल व्हॅन नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील खेडोपाडी पोहोचणार आहे. 3 जानेवारी 2026 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष सुनिल वेदपाठक यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय नांदेड येथून मोबाईल व्हॅनच्या प्रवास कार्यक्रमास हिरवा झेंडा दाखवून कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न होईल. त्यानंतर तालुक्यातील पुढील प्रवास पुढीलप्रमाणे राहील.
दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी लोहा तालुक्यात मारतळा येथे, 5 जानेवारी 2026 रोजी कंधार तालुक्यात कौठा, 6 जानेवारी 2026 रोजी मुखेड तालुक्यात बाऱ्हाळी, 7 जानेवारी 2026 रोजी देगलूर तालुक्यात हानेगाव, 8 जानेवारी 2026 रोजी नायगाव तालुक्यात सावरखेड, 9 जानेवारी 2026 रोजी बिलोली तालुक्यात बडुर, 12 जानेवारी 2026 रोजी धर्माबाद तालुक्यात मंगनाळी, 13 जानेवारी 2026 रोजी उमरी तालुक्यात गोरठा, 14 जानेवारी 2026 रोजी मुदखेड तालुक्यात डोणगाव, 15 जानेवारी 2026 रोजी अर्धापूर तालुक्यात शेलगाव, 16 जानेवारी 2026 रोजी हदगाव तालुक्यात तामसा, 17 जानेवारी 2026 रोजी माहूर तालुक्यात वझरा शे.फ., 19 जानेवारी 2026 रोजी किनवट तालुक्यात मांडवी, 20 जानेवारी 2026 रोजी हिमायतनगर तालुक्यात मंगरुळ, 21 जानेवारी 2026 रोजी भोकर तालुक्यात हळदा येथे तर 22 जानेवारी 2026 रोजी नांदेड तालुक्यातील मौजे बळीरामपुर येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कायदेविषयक शिबीर व फिरते लोकअदालतीच्या माध्यमातून राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील विविध योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शन देण्यात येणार आहे. या गावांच्या पोलीस स्टेशन हद्यीतील तडजोडपात्र दिवाणी, फौजदारी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील पक्षकार, ग्रामस्थ-नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शरद देशपांडे यांनी केले आहे.

5
724 views