logo

'तू हवं तितकं रड...,' 10 वीत शिकणाऱ्या सांगलीच्या शौर्य पाटीलने दिल्लीत उचललं टोकाचं पाऊल; सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासे.....

दिल्लीतील शाळेत दहावीत शिकणारा महाराष्ट्राचा विद्यार्थी शौर्य पाटीलच्या आत्महत्येनं राजधानीत खळबळ उडाली आहे. प्राचार्य आणि शिक्षिकांच्या कथित जाचाला कंटाळून शौर्यने टोकाचं पाऊल उचललं आहे. शौर्य पाटीलने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या दीड पानांच्या सुसाईड नोटमध्ये तीन शिक्षिका आणि प्राचार्य यांना जबाबदार धरलं आहे. या घटनेनंतर शाळेबाहेर विद्यार्थी, पालक आणि नातेवाईकांकडून आंदोलन केलं जात असून, कारवाईची मागणी होत आहे. 

दिल्लीच्या गोल मार्केट भागात असणाऱ्या शाळेत 16 वर्षीय शौर्य पाटील शिकत होता. मंगळवारी दुपारी त्याने राजेंद्र नगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून खाली उडी मारून आत्महत्या केली. यावेळी त्याच्या बॅगेत दीड पानांची सुसाईड नोट सापडली. ज्यामध्ये शौर्यने लिहिलं होतं की, “शिक्षिका आणि प्राचार्या यांच्या जाचाला कंटाळलो आहे. इतर विद्यार्थ्यांवर माझ्यासारखी वेळ येऊ नये, त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करा. माझे अवयव गरजूंना दान करा".
राजेंद्र गार्डन मेट्रो पोलिसांनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख असणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार, 18 नोव्हेंबर रोजी शौर्य नाटकाचा सराव करत होता. पाय घसरून तो खाली पडला. परंतु शिक्षिका त्याला सर्वांसमोर म्हणाली की, “ड्रामा करतोयस, ओव्हर अॅक्टिंग करतोयस”. शौर्य रडू लागला तरी “कितीही रड, मला फरक पडत नाही”, असे शब्द वापरल्याचं तक्रारीत लिहिलं आहे. त्यावेळी प्राचार्या उपस्थित असूनही त्यांनी काही हस्तक्षेप केला नाही, असा आरोप कुटुंबाने केला आहे.
शौर्यचे वडील प्रदीप पाटील यांनी सांगितलं आहे की, “आम्ही शाळा बदलण्याचा विचार केला होता. पण दहावीच्या परीक्षेमुळे थांबलो. शिक्षिकांच्या अपमानास्पद वागणुकीला मुलगा कंटाळला होता”.
घटनेच्या दिवशी शौर्य घरची गाडी यायच्या आधीच शाळेतून बाहेर पडला. मित्रांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो निघून गेला. सीसीटीव्ही फुटेजनुसार तो काही मिनिटे शांत बसलेला दिसतो. यानंतर त्यानं आत्महत्या केली. 
शौर्यच्या मृत्यूनंतर आज शाळेबाहेर तणावपूर्ण वातावरण आहे. नातेवाईक, मित्र, पालक, आणि परिसरातील लोक मोठ्या संख्येनं जमा झाले आहेत. प्राचार्या आणि चारही शिक्षिकांवर तत्काळ कडक कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे. तसंच शाळेनं जबाबदारी स्वीकारावी आणि  विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत स्पष्ट धोरण आणावं अशी मागणी आहे. 

मुलगा महाराष्ट्रातील सांगलीचा

शौर्य प्रदीप पाटील,असे पीडित विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा सांगली जिल्ह्यातला खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी आहे. वडील प्रदीप पाटील हे सोने-चांदी गलाई व्यवसाय निमित्त गेल्या अनेक वर्षापासून दिल्ली येथे स्थायिक आहेत. त्यामुळे शौर्य हा त्यांच्या कुटुंबीयांसह दिल्लीतील राजीवनगर भागात वास्तव्यास होता.तो दिल्लीतील विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. मंगळवार 18 नोव्हेंबर रोजी राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून त्याने खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली.

89
4563 views