logo

आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून मानवतेचा संदेश देत 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची सांगता द्वेषाच्या भिंती पाड

आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून मानवतेचा संदेश देत
56व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची सांगता

द्वेषाच्या भिंती पाडून प्रेमाचे पुल उभारण्याचे निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचे आवाहन

औरंगाबाद 30 जानेवारी, 2023: “मानवाने आपल्या मनातील द्वेषाच्या भिंती जमिनदोस्त करुन प्रेमाचे पुल उभारावेत” असे आवाहन निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमामध्ये मानवतेच्या नावे संदेश देताना केले.
औरंगाबादच्या बिडकीन डीएमआयसी परिसरात सुमारे 300 एकर मैदानावर हा तीन दिवसीय विशाल निरंकारी संत समागम दिनांक 27 ते 29 जानेवारी, 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि देशाच्या विविध भागांतून लाखोंच्या संख्येने जनसागर लोटला होता. विदेशातूनही शेकडो भक्त या समागमामध्ये सहभागी झाले होते.
सद्गुरु माताजी म्हणाल्या, की या जगात आपण मानव म्हणून जन्माला आलो आहोत तर उदात्त मानवी मूल्ये आणि दिव्य गुणांनी युक्त जीवन जगायला हवे.
शोभायात्रा
या संत समागमाचा शुभारंभ 27 जानेवारी रोजी सकाळी औरंगाबाद-पैठण मार्गालगत असलेल्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) अंतर्गत मार्गावर आयोजित केलेल्या भव्य शोभा यात्रेने झाला. या शोभायात्रेमध्ये सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी हे दिव्य युगुल एका फुलांनी सुशोभित खुल्या वाहनामध्ये विराजमान राहून शोभायात्रेद्वारे त्यांच्या समोरुन जाणाऱ्या भक्तगणांचे अभिवादन स्वीकारत त्यांना आशीर्वाद प्रदान करत होते.
या शोभायात्रेमध्ये श्रद्धा, भक्ती, प्रेमाच्या अलौकिक भावनांनी युक्त होऊन आपापल्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवत भाविक-भक्तगण मानवतेच्या रंगांचे दर्शन घडवताना दिसत होते. त्यामध्ये वाशिममधून पावली नृत्य, अकोला व कोटारी आंध्र प्रदेश येथून बंजारा नृत्य, शहापूर येथून तारपा नृत्य, मुंबई, महाड व सावरगांव येथून लेझिम, राळेगणसिद्धी व कळंबोली येथून दिंडी, जामखेड येथून समूह नृत्य, शिवडी (मुंबई) व कोपरखैरणे (नवी मुंबई) येथून वारकरी, चिपळूणमधून ढोल पथक, विट्ठलवाडी येथून समूह नृत्य, महाड येथून आदिवासी नृत्य, दापोली व पालघर येथून कोळी नृत्य, कराडमधून धनगरी गजनृत्य, चारोटी येथून तारपा नृत्य इत्यादिंचा समावेश होता.
शाश्वत ईश्वराशी नाते जोडल्यानेच जीवन आनंदमय व सार्थक होऊ शकते
शोभा यात्रेनंतर सुरु झालेल्या सत्संगाच्या खुल्या सत्राच्या शेवटी सद्गुरु माताजींनी प्रतिपादन केले, की शाश्वत ईश्वराशी नाते जोडल्यानेच जीवन आनंदमय व सार्थक होऊ शकते. कारण प्राकृतीक वस्तूंपासून आपल्याला कायमदायम टिकणारा आनंद मिळू शकत नाही. प्राकृतीक वस्तूंपासून मिळणाऱ्या सुखाच्या पलीकडे एक शाश्वत आनंदाची अवस्था आहे आणि ती अवस्था केवळ अविनाशी परमात्म्याशी एकरूप होण्यानेच प्राप्त होऊ शकते. परमात्मा हे एक असे सत्य आहे ज्याला खोटे ठरवले जाऊ शकत नाही. परमात्मा आपल्या जीवनात सदोदित विद्यमान असतो. तो घटत नाही किंवा वाढत नाही, जळत नाही अथवा तुटत नाही. परमात्मा कोणत्याही आकाराशी बांधील नाही. अशा परम अस्तित्वावर आधारित जगणारा मनुष्य दु:खाने विचलीत होत नाही किंवा सुखाने हुरळून जात नाही.
सेवादल रॅली
समागमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरवात एका प्रभावशाली सेवादल रॅली द्वारे झाली. या सेवादल रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने सेवादलाचे महिला व पुरुष स्वयंसेवक आपापल्या निर्धारित गणवेषामध्ये सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये मिशनच्या शिकवणूकीवर आधारित लघुनाटिका प्रस्तुत करण्यात आल्या ज्यामधून भक्तीमध्ये सेवेचे महत्व पटवून दिले गेले. या व्यतिरिक्त शारीरिक व्यायाम, योगा व मल्लखांब यांसारखे साहसी खेळ सादर केले गेले.
रॅलीच्या शेवटी सेवादल बंधु-भगिनींना आपले पावन आशीर्वाद प्रदान करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की ब्रह्मज्ञानी तर सदैवकाळ सेवादारच असतो. सेवा ही आवश्यकतेनुसार दिलेल्या आदेशानुसार पूर्ण तन्मयतेने, सजगपणे आणि भक्तीभावाने केली जाते.
अहंकाराचा त्याग करुन निरंकाराला हृदयामध्ये वसवावे
समागमाच्या दुसऱ्या दिवशीच्या मुख्य सत्राला संबोधित करताना सद्गुरु माताजींनी सांगितले, की “मानवाने अहंकाराचा त्याग करावा आणि निरंकार प्रभूला आपल्या हृदयामध्ये वसवून यथार्थ मानवी जीवन जगावे.
त्या पुढे म्हणाल्या, की अहंकारामुळे मनुष्य स्वत:ला श्रेष्ठ मानत असतो आणि मनामध्ये भौतिक वस्तूंना ईश्वरापेक्षाही अधिक महत्व देत असतो. परिणामी तो जीवनाच्या वास्तविकतेपासून अनभिज्ञ राहतो आणि खरेखुरे मानवी जीवन जगत नाही. खऱ्या अर्थाने मानवी जीवन जगण्यासाठी त्याला ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून ईश्वराशी नाते जोडण्याची गरज आहे.
मा.मुख्यमंत्री यांची सदिच्छा भेट:
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांनी रविवारी संत समागमाला सदिच्छा भेट दिली आणि सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांचे आशीर्वाद प्राप्त केले. याप्रसंगी संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी उदात्त कार्याचा गौरव करताना ते म्हणाले, निरंकारी मिशन विश्वबंधुत्वाचे उदात्त कार्य करत आहे. शिवाय अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे. आपला अनुभव सांगताना ते म्हणाले, की महाडमध्ये आलेल्या महापुराच्या वेळी निरंकारी भक्तांनी जे मदत कार्य केले होते ते प्रत्यक्ष पहायला मिळाले. खरोखरच ते प्रशंसनीय आणि प्रेरणादायी असे होते. मिशनकडून कोविड दरम्यान सुद्धा कौतुकास्पद कार्य केले असून नैसर्गिक आपत्ती असो किंवा स्वच्छता अभियानासारखे सामाजिक उपक्रम असोत अनेक कार्यामध्ये हे मिशन आपले योगदान देत आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री महोदयांसमवेत औरंगाबादचे पालकमंत्री श्री.संदीपान भुमरे आणि मंत्री श्री.अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बहुभाषी कवी संमेलन
समागमाच्या शेवटच्या दिवशी सत्संगाच्या मुख्य सत्रामध्ये एक बहुभाषी कवी संमेलन आयोजित करण्यात आले ज्याचा विषय होता “आत्मिकता व मानवता संग संग ही सदा असावी”. या कवी संमेलनामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, भोजपुरी, कन्नड, अहिराणी, कोंकणी आदि भाषांतील कवींनी आपल्या कविता सादर केल्या. समागमाच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी लघु कवी संमेलनांमध्ये प्रत्येकी ५ कविता सादर करण्यात आल्या ज्या मराठी, हिंदी व पंजाबी भाषांमधील होत्या.
संत समागमाची सांगता
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या अमृतवाणी द्वारे संत समागमाची सांगता झाली. त्यामध्ये त्यांनी प्रतिपादन केले, की निराकार परमात्मा कायमदायम सत्य आहे. सर्व काळात होऊन गेलेल्या संतांनी जगाला एकच संदेश दिला आहे. वेगवेगळ्या भाषेतील आणि वेगवेगळ्या प्रांतांतील संतांचा संदेश सारखाच आहे. हा काही निव्वळ योगायोग नव्हे. त्या काळी आजसारखी सोशल मीडियाची सोयदेखील नव्हती. यावरुन एकच सिद्ध होते, की ब्रह्मज्ञान हे तेव्हाही सत्य होते आणि आजही सत्य आहे. या ज्ञानाद्वारे निराकाराची प्राप्ती करुन जिवंतपणीच मुक्तीची अवस्था धारण करणे हेच मानवी जीवनाचे मुख्य लक्ष्य होय.
निरंकारी प्रदर्शनी :
संत निरंकारी मिशनचा इतिहास, विचारधारा व सामाजिक उपक्रमांचे सचित्र दर्शन घडविणारी निरंकारी प्रदर्शनी समागम स्थळावर आलेल्या भक्तगणांच्या आकर्षणाचे केंद्र बनून राहिली होती. या प्रदर्शनीमध्ये चित्रे, छायाचित्रे, विविध मॉडल्स यांच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मिशनचा इतिहास, विचारधारा व सामाजिक उपक्रमांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
बाल प्रदर्शनीमध्ये मुलांच्या जीवनात मिशनच्या संदेशाचे महत्व आध्यात्मिक जागृतीची गरज यांचे महत्व पटवून देण्यात आली होती तर आरोग्य व समाजकल्याण विभागाच्या प्रदर्शनीमध्ये मानवी देहाच्या आरोग्याची काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन करण्याबरोबरच मिशनच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकण्यात आला होता.
कायरोप्रॅक्टिक शिबिर
      संत समागमामध्ये आयोजित करण्यात आलेले कायरोप्रॅक्टिक चिकित्सा शिबिर गरजू भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र बनून राहिले होते. कायरोप्रॅक्टिक ही एक वैकल्पिक चिकित्सा पद्धती आहे जी विशेषत: मेरुदंडाच्या तांत्रिक विकारांचे निदान, निवारण आणि उपचारांवर भर देते. मागील जवळ जवळ 10-11 वर्षांपासून निरंकारी संत समागमांमध्ये या शिबिरांचे आयोजन केले जात आहे.
या शिबिरामध्ये कॅनडा, अमेरिका, यू.के., यूरोप, चीन, जर्मनी आणि सिंगापूर आदि 7 देशांतून आलेल्या 17 डॉक्टरांचे पथक निष्काम भावाने आपल्या सेवा अर्पण करत आहेत. मागील दोन दिवसांत या शिबिरामध्ये सुमारे 6000 गरजूंनी या उपचारांचा लाभ घेतला.
लाईफ कायरोप्रॅक्टिक वेस्ट या संस्थेचे अध्यक्ष डॉ.ऑर्बिस्टन यांनी सांगितले, की निरंकारी संत समागमाच्या पूर्वतयारीसाठी ज्या उत्साहाने व निष्काम भावनेने निरंकारी सेवादार आपल्या सेवा अर्पण करतात त्यातून आम्हाला मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा प्राप्त होते आणि समागमाच्या दैवी वातावरणातून या निष्काम सेवा पार पाडण्याची ऊर्जा प्रापत होते.
लंगर, निवास व वाहतूक व्यवस्था
संत समागमासाठी आलेल्या भाविकांसाठी समागम समितीच्या मार्गदर्शनाखाली 24 तास लंगरची व्यवस्था करण्यात आली होती. आलेल्या भाविकांची राहण्याची व्यवस्था प्रशस्त तंबूंमध्ये केली होती तर त्यांच्यासाठी वीज, पाणी, स्वच्छतागृह इत्यादिंचीही सुंदर व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांना औरंगाबाद येथून समागम स्थळावर येण्या-जाण्यासाठी मोफत बसेसचीही व्यवस्था केलेली होती.

122
14739 views
  
1 shares