logo

अमरावती जिल्ह्यात ६ व्यक्तींना डेल्टा प्लसची लागण…

पुसद : कोरोनाला रोखण्यासाठी कोविड रुग्णांचे जिनोमिक सिक्वेंसिंग नियमित स्वरूपात करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातून गत महिन्यात पाठविलेल्या नमुन्यांपैकी सहा नमुने डेल्टा प्लसचे असल्याचे आढळले असून, या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणेने याबाबत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, फ्लूसदृश आजारासंबंधी सर्वेक्षण आदी प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी यंत्रणेला दिले, तसेच या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही दक्षता नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. कोरोनाला रोखण्यासाठी कोविड रुग्णांचे जिनोमिक सिक्वेंसिंग करण्यात येत असून, त्यासाठी एनआयव्ही प्रयोगशाळेला काही निवडक नमुने पाठविण्यात येतात. त्यात यापूर्वी पाठविलेल्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे.

हे महिनाभरापूर्वी आढळलेले रुग्ण असून, त्यांची प्रकृती चांगली आहे व त्यांच्याशी नियमित संपर्क केला जात आहे. त्याचप्रमाणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही सुरु केले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली. Ad राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडून प्राप्त अहवालानुसार अमरावती जिल्ह्यात अमरावती महापालिका क्षेत्रात 3, चांदूर बाजार तालुक्यात बोराळा येथे 1, वरुड येथे 1, मोर्शी तालुक्यात पोडवे येथे 1 अशा एकूण 6 व्यक्तींना डेल्टा प्लसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या सर्व व्यक्तींचा रुग्णांना आरोग्य यंत्रणेकडून संपर्क साधण्यात आला असून, आवश्यक दक्षता घेतली जात आहे. डेल्टा प्लस रुग्ण आढळल्याने सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली तरी योग्य खबरदारी घेतलीच गेली पाहिजे. त्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स टीम, आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे.

रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचा शोध घ्यावा. फ्लू सदृश्य आजाराचे सर्वेक्षण करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यंत्रणेला दिले आहेत. भीती नको; पण सतर्कता महत्वाची कोरोनावर संपूर्णपणे मात करण्यासाठी आपण सर्वजण गत दीड वर्षांपासून सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. बाधितांची संख्या कमी झाल्याने निर्बंधही हटविण्यात आले. मात्र, डेल्टा प्लसचे रुग्ण पाहता दक्षता नियमांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे.

रुग्णसंख्या कमी झाली आहे. असे असताना आता काळजी घेतली नाही तर तिसरी लाट येऊ शकते. ही संभाव्यता लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. मात्र, तिसरी लाट येऊ नये यासाठी नियमांचे पालन अत्यावश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क, स्वच्छता, सोशल डिस्टन्स यांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. विषाणूने आपली जनुकीय रचना बदलत राहणे हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा भाग आहे.

कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी कोविड अनुरूप वर्तणूक ज्यात मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे आणि गरज असेल तेव्हाच घराच्या बाहेर पडणे याचे आपल्याला पालन करावे लागणार आहे. त्यामुळे भीती न बाळगता सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

1
19681 views