
1,10,000 ची लाचघेणारा हवालदार अॅन्टी करप्शनच्या जाळयात; पुणे ग्रामीण पोलिस दलात प्रचंड खळबळ
गुन्हा दाखल न करण्यासाठी मदत करण्यासाठी एका हवालदाराने तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची मागणी करुन १ लाख १० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून या हवालदाराला रंंगेहाथ पकडले.
यामुळे पुणे ग्रामीण पोलिस दलामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. दादासाहेब नामदेव ठोंबरे (वय ५०) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
दादासाहेब ठोंबरे हा बारामती तालुका पोलीस ठाण्यात नेमणूकीला होता. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या तरुणाने तक्रार दिली आहे. मारहाणीच्या प्रकरणातून तक्रारदार तरुणाचे नाव कमी व त्याच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी मदतीसाठी दादासाहेब ठोंबरे याने १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितली.
या तरुणाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यांनी केलेल्या पडताळणीत तोडजोड होऊन ठोंबरे याने १ लाख १० हजार रुपये घेण्याचे मान्य केले. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव , अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विजयमाला पवार , पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे , पोलीस अंमलदार रतेश थरकार, अंकुश आंबेकर यांनी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून १ लाख १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दादासाहेब ठोंबरे याला रंगेहाथ पकडण्यात आले. बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.