कळमेश्वरात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ? भेसळ युक्त व मुदतवाह्य खाद्यपदार्थाचे सर्रास विक्री.
कळमेश्वर : शहरात भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ, मुदतबाह्य खाद्यपदार्थ आणि निकृष्ट दर्जाच्या वस्तूंची खुलेआम विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. मात्र, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून प्रभावी कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भाजपचे माजी महामंत्री प्रशांत इखार यांनीही अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
काही दिवसांपूर्वी मोहपा येथे एका पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पावर धाड टाकण्यात आली, जिथे मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली होती. तरीही, अन्न व औषध प्रशासन अधिकारी वेळोवेळी तपासणीसाठी कळमेश्वर शहरात येत असताना कारवाई का होत नाही, याबाबत नागरिकांमध्ये संशय आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, एका विशिष्ट दुकानदाराकडून आर्थिक संकलन संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले जाते, ज्यामुळे गैरप्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अधिकाऱ्यांवर होत आहे. यामुळे लहान मुलांसह सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे. नागरिक निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.