अजय सोपान साळवे यांची इंडियन आर्मीमध्ये निवड; धोंड पारगावच्या सुपुत्राने गावाचे नाव केले उज्ज्वल...
जामखेड तालुक्यातील धोंड पारगाव येथील अजय सोपान साळवे यांची भारतीय सैन्य दलाच्या जनरल ड्युटी (GD) पदासाठी निवड झाली असून, त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे गावात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अजय साळवे हे शेतकरी कुटुंबातील असून लहानपणापासूनच त्यांना भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा होती. आर्थिक व सामाजिक अडचणींवर मात करत त्यांनी नियमित शारीरिक सराव, धावणे, मैदानी प्रशिक्षण आणि लेखी परीक्षेची तयारी यावर विशेष भर दिला. त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ म्हणून त्यांची इंडियन आर्मीमध्ये जनरल ड्युटी (GD) पदासाठी निवड झाली आहे.
अजय यांच्या निवडीची बातमी समजताच धोंड पारगाव परिसरात आनंद व्यक्त करण्यात आला. कुटुंबीयांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा केला. गावातील नागरिक, युवक, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील युवकांसाठी अजय साळवे यांचे यश प्रेरणादायी ठरणारे आहे. जिद्द, मेहनत आणि योग्य नियोजनाच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या यशामुळे परिसरातील अनेक युवकांना सैन्य भरतीकडे व देशसेवेकडे प्रेरणा मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
अजय साळवे यांच्या या यशामुळे धोंड पारगाव गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, त्यांच्या भावी सैन्य सेवेसाठी संपूर्ण गावाकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.