फलटण येथे पालखी मार्ग अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र; अधिकार गृहासमोरील सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांचे शासकीय निवासस्थानाचे भिंतीचे अतिक्रमण निघणार का?
फलटण:– संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात आणि पालखी मार्गावर नगरपालिका स्थानिक प्रशासनाच्या वतीने अतिक्रमणे हटवण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे.मात्र अधिकार गृहासमोरील सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांचे शासकीय निवासस्थानाचे कंपाउंडचे अतिक्रमण खरोखरच निघणार का?याची उत्सुकता नागरिकांना लागून राहिली आहे.
फलटण नगर पालिकेच्या वतीने शहरातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे पालखी सोहळा सुखकर व्हावा आणि वाहतुकीची कोंडी टाळता यावी यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनधिकृत बांधकामे, शेड आणि गाळे जमीनदोस्त केले जात आहेत.मात्र, या मोहिमेदरम्यान आता एक अत्यंत संवेदनशील आणि चर्चेचा विषय समोर आला आहे. फलटण येथील ‘अधिकार गृह’ (प्रांत कचेरी) इमारतीच्या समोरच असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (PWD) अभियंत्यांचे शासकीय निवासस्थानाची संरक्षक भिंत अतिक्रमण क्षेत्रात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
प्रशासनाने सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक आणि दुकानदारांच्या अतिक्रमणांवर कोणतीही गय न करता बुलडोझर चालवला आहे. अशा परिस्थितीत, चक्क शासकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थानच जर अतिक्रमणित क्षेत्रात येत असेल, तर त्यावर प्रशासन काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण फलटणकरांचे लक्ष लागले आहे.
“सामान्य जनतेच्या छोट्या-मोठ्या टपऱ्या आणि शेडवर तात्काळ हातोडा पडतो. मग शासकीय खात्याच्याच निवासस्थानाचा संरक्षित भिंतीचा भाग रस्त्यात येत असेल, तर कायदा सर्वांसाठी समान असायला हवा. हे शासकीय निवासस्थानाची संरक्षित भिंत निघणार की याला अभय मिळणार, हे प्रशासनाने स्पष्ट करावे,” अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
सध्या पालखी मार्गावरील इतर अतिक्रमणे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, अधिकार गृहासमोरील या शासकीय निवासस्थानाच्या अतिक्रमित भागावर प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, यावर या मोहिमेची पारदर्शकता अवलंबून असणार आहे. येत्या एक ते दोन दिवसांत याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.