पानवेल उत्पादकांचे उपोषण!
जळगाव :
जिल्ह्यातील पानवेल उत्पादकांनी विविध मागण्यांसाठी जी.एस. ग्राऊंडवर लाक्षणिक उपोषण करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या मागण्यांविषयी दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
पानवेलचा अद्यापपर्यंत कोणत्याही पिकात समावेश नसल्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा नुकसान होते. या पिकाचे लागवड क्षेत्र कमी होत असल्याने रोजगार हमी योजनेत या पिकाचा समावेश केल्यास शेतकऱ्यांना मदत मिळेल व पानवेल पिकाचे लागवड क्षेत्र वाढेल. नैसर्गिक आपत्ती औषधी पिकांप्रमाणे इतर पिकांना ज्याप्रमाणे विमा संरक्षण त्यांच्या उत्पादनानुसार असते.
पीक विमा पानवेलला मिळावा व नैसर्गिक आपत्ती वेळी औषधी वनस्पतीनुसारच नुकसान भरपाई मिळावी, पानवेल उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के (सबसिडी) अनुदानाची शेडनेटची योजना मिळावी, पानमळ्यावर वेळोवेळी येणाऱ्या मर रोगाबाबत उच्चस्तरावर संशोधन करावे, जेणेकरून या रोगावर नियंत्रण करून शेतकऱ्याचे होणारे नुकसान टळेल, यासह विविध मागण्यांसाठी उत्पादकांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
मागणी करुनही कृषी अधिकाऱ्यांसह
जिल्हाधिकाऱ्यांकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याने या उत्पादकांनी दि.१ जून रोजी लाक्षणिक उपोषण केले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कार्यवाहीचे आदेश दिले. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण उपस्थित होते.
आंदोलनात पानवेल कृषी विकास मंडळाचे अध्यक्ष प्रमोद उंबरकर, पुंडलिक बारी, संजय वराडे, प्रवीण नागपुरे, विलास रंदाळे, प्रशांत रंदाळे, प्रकाश बोबडे, रवींद्र बोबडे, शशिकांत वराडे, मोहन ताडे, सुरेश बारी, रमेश अटबाल, वासुदेव वराळे, संतोष तेलंग्रे, शिरसोली येथील रतन काटोले, अनिल बारी, विष्णू बारी, प्रकाश लावणे, प्रकाश अस्वार, बापू. खलसे, अमोल काटोले, शेंदुर्णी येथील रवींद्र बोडखे, राजू कोथलकर, ज्ञानेश्वर बारी, साहेबराव शिणकर आदी उपस्थित होते.