logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

खटावला ९८ कोटींचा स्मृतीवन आणि वॉटर पार्क प्रकल्प

सातारा जिल्यातील खटाव तालुक्याच्या विकासाला नवे परिमाण देणारा तब्बल ९८ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच साकार होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु आणि सहकार भारतीचे संस्थापक स्व. लक्ष्मणराव इनामदार यांचे जन्मगाव असलेल्या खटावमध्ये पिंपळेश्वर देवस्थान आणि येरळा नदी परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प आमदार महेश शिंदे आणि जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी केला आहे. या ड्रीम प्रोजेक्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वतः मान्यता दिल्याची माहिती मिळाली असून शासनाच्या विविध विभागांनी त्याच्या आराखडा आणि अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

या प्रकल्पांतर्गत खटावमध्ये स्मृतीवन, नक्षत्रवन, आकर्षक बगीचे, सुशोभित घाट, आधुनिक वॉटरपार्क आणि बोटींग क्लब उभारण्यात येणार आहेत. येरळा नदीच्या काठावरील परिसराचे सौंदर्यीकरण करून तो पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचा उद्देश आहे. धार्मिक, पर्यावरणीय आणि पर्यटन या तिन्ही घटकांचा समन्वय साधणारा हा प्रकल्प खटावच्या विकासात मैलाचा दगड ठरणार असल्याचे मानले जात आहे.

स्मृतीवन आणि नक्षत्रवनामुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार असून विविध वृक्षप्रजातींचे संवर्धन आणि जनजागृती होणार आहे. पिंपळेश्वर देवस्थान परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याने भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होतील. याशिवाय नदीकाठी घाट आणि फिरण्यासाठी आकर्षक उद्याने उभारली जाणार आहेत. वॉटरपार्क आणि बोटींग क्लबमुळे स्थानिकांसह पर्यटकांसाठी मनोरंजनाची नवी केंद्रे निर्माण होतील.

या प्रकल्पामुळे खटाव तालुक्यात पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, तसेच हॉटेल, वाहतूक आणि इतर पूरक व्यवसायांनाही फायदा होईल. ग्रामीण भागातील पर्यटन विकासाचा आदर्श नमुना म्हणून हा प्रकल्प पुढे येऊ शकतो.

आमदार महेश शिंदे आणि डॉ. प्रिया शिंदे यांनी खटावच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प हाती घेतला असून तो त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक मानला जात आहे. शासनाच्या विविध विभागांच्या सहकार्याने प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर खटावचा चेहरा-मोहरा बदलणार असून तो सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे पर्यटन आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

0
1266 views

Comment