logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

विविध क्षेत्रांतील १८ मान्यवरांचा एकत्र गौरव; भालेरावनगरपाटीलगढीत बंधुभावाचा सोहळा केक, औक्षण, अभिष्टचिंतन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला सोहळा

विविध क्षेत्रांतील १८ मान्यवरांचा एकत्र गौरव; भालेरावनगर–पाटीलगढीत बंधुभावाचा सोहळा

केक, औक्षण, अभिष्टचिंतन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला सोहळा

अमळनेर (प्रतिनिधी): भालेरावनगर व पाटीलगढी परिसरातील सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि संस्कारांचे जतन करणारा सामूहिक राष्ट्रीय वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा दि. १ जून रोजी सायंकाळी बापूसाहेब विलास हिम्मतराव पाटील यांच्या घरासमोरील चौकात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या १८ मान्यवर बंधूंचा सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकोप्याची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांनी या परंपरेला सुरुवात करणाऱ्या गुरुजनांच्या दूरदृष्टीला अभिवादन केले. प्रशासकीय सोयीसाठी १ जून ही तारीख निश्चित करण्यात आली असली तरी त्यामागील "एकत्र येणे हाच खरा उत्सव" हा विचार आजही जिवंत असल्याची भावना वक्त्यांनी व्यक्त केली. भालेरावनगर आणि पाटीलगढीत वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम सामूहिकरीत्या राबविले जातात. त्याच संस्कारांचा प्रत्यय या कार्यक्रमातून पुन्हा एकदा आला.
यावेळी वाढदिवसाचे मानकरी म्हणून मा. विलास हिम्मतराव पाटील (रणाईचेकर), परमेश्वर पाटील (लोणकर), अनिल दुसाने (शिरूडकर), रमेश चव्हाण (रणाईचेकर), विनोद वैद्य (अमळनेरकर), शिवाजी पाटील (आर्डीकर), दीपक वाघ (दहिवदकर), युवराज यशवंत वानखेडे (वालखेडा), हरिश्चंद्र कढरे (निमकर), डी. जी. पाटील (वेळोदेकर), संजय बोरसे (मेहूटेहू), गुलाब बोरसे (लोणकर), गोपाळ आत्माराम सोलंकी (एलआयसी शाखा प्रबंधक), रविकांत पाटील (चहावाले), प्रकाश मन्साराम पाटील (वाघोदेकर), राजेंद्र नाना पाटील (आर्डीकर), डी. एम. पाटील (जानवेकर) आणि सदाशिव पौलाद पवार (साळवेकर) यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन बापूसाहेब संदीप पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य) यांनी केले. यावेळी प्राचार्य पी. के. पाटील, गोपाळ सोलंकी, माजी नायब तहसीलदार रामचंद्र उपासनी, अमळनेर नगरपालिकेचे उपाध्यक्ष प्रशांत दादा निकम, विजय पाटील आणि सेवानिवृत्त आदर्श केद्रप्रमुख आबासाहेब गोकुळ पाटील यांनी अभिष्टचिंतनपर मनोगत व्यक्त करत मानकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. समाजातील एकोपा, परस्पर सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.
सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रंगत पाहायला मिळाली. उज्वल पाटील (इंजिनिअर), महेंद्र काटे, संतोष पाटील आणि हरिश्चंद्र कढरे यांनी गीतगायन सादर केले, तर मिलिंद पाटील यांनी रहिवाशांवर आधारित पोवाडा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व १८ मानकरी बंधूंनी एकत्रितपणे केक कापून वाढदिवस साजरा केला. टाळ्यांच्या गजरात मेडिकल ऑफिसर विलासराव पाटील यांच्या सुकन्येने सर्वांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी भालेरावनगर व पाटीलगढीतील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक व बालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. सामूहिक वाढदिवसाच्या या उपक्रमाने सामाजिक सलोखा, परस्पर प्रेम आणि एकीचे बळ अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

17
4855 views

Comment