logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

६ महिन्यांपासून वेतन रखडले; अहमदनगरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू!

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ६ महिन्यांच्या प्रलंबित वेतनासाठी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन

अहमदनगर, दि. १ जून २०२६ : महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता), स्वच्छ भारत मिशन व जल जीवन मिशन अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज, १ जून २०२६ पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेले मानधन तात्काळ अदा करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी जिल्हा परिषद अहमदनगर येथील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

आंदोलनस्थळी लावण्यात आलेल्या फलकावर "६ महिन्यांच्या प्रलंबित मानधनासाठी दिनांक ०१ जून २०२६ पासून बेमुदत काम बंद आंदोलन" असा उल्लेख करण्यात आला आहे. "एकच घोषणा – हक्क आमच्या हक्काचा" तसेच "अन्याय करणाऱ्यांचा धिक्कार असो" अशा घोषणांनी आंदोलनस्थळ दणाणून गेले.

या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले असून, जोपर्यंत थकीत मानधनाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाशी संबंधित कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्यामुळे ग्रामीण भागातील जल जीवन मिशन तसेच स्वच्छ भारत मिशनच्या विविध कामांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

25
3601 views

Comment