logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बेसा येथे भीषण आगीत आठ बकऱ्यांचा मृत्यू

वणी, ता. ३० : तालुक्यातील बेसा येथे शनिवारी (ता. ३०) दुपारी लागलेल्या भीषण आगीत गोठ्यात बांधून असलेल्या आठ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत बकरीपालक शेतकरी दत्तू गोहोकार यांचे अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.
दत्तू गोहोकार हे शेतीसोबतच बकरीपालन व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी बकऱ्यांना शेतशिवारात चारण्यासाठी नेले होते. दुपारच्या सुमारास गावातील गोठ्यात बांधून ते घरी परतले. त्यानंतर काही वेळातच गोठ्याला अचानक आग लागली. गोठ्यात साठवून ठेवलेला चारा असल्याने आगीने क्षणात उग्र स्वरूप धारण केले.
धुराचे लोट आणि ज्वाळा दिसताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र, आग वेगाने पसरत असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे वणी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
मात्र, तोपर्यंत गोठ्यात बांधलेल्या आठ बकऱ्या जिवंत जळाल्या होत्या. आगीची तीव्रता इतकी होती की, गोठ्यातील साहित्य व चाऱ्याचेही मोठे नुकसान झाले. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू आहे.
या घटनेमुळे आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसलेल्या शेतकरी दत्तू गोहोकार यांना शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे

9
3702 views

Comment