logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शहापूर येथील किन्हवली येथे रक्षा विसर्जनाच्या जेवणातून 22 जणांना विषबाधा ,शहापूर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू


शहापूर तालुक्यातील किन्हवली परिसरातील शिळ गावात रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या सामूहिक जेवणातून एकाच कुटुंबातील २२ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. प्रकृती बिघडलेल्या सर्वांना किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रातून पुढील उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

शिळ गावातील अशोक भोईर यांच्या मातोश्री बारकाबाई बाळू भोईर यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच गुरूवारी रक्षा विसर्जनाचा विधी पार पडला. या कार्यक्रमासाठी नातेवाईक आणि पाहुण्यांची उपस्थिती होती. दुपारी तयार करण्यात आलेले जेवण रात्री उरलेले असल्याने तेच अन्न कुटुंबीयांनी पुन्हा सेवन केल्याचे सांगितले जात आहे. जेवणानंतर काही वेळातच अनेकांना उलट्या, मळमळ, जुलाब, पोटदुखी आणि तापाचा त्रास सुरू झाला.
रात्री नऊच्या सुमारास एकामागोमाग एक जणांची प्रकृती खालावू लागल्याने नातेवाईकांनी तातडीने सर्वांना किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता डॉक्टरांनी सर्वांना पुढील उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविले. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात उपचार सुरू होते. सुदैवाने सर्व रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत असून कोणाचीही प्रकृती चिंताजनक नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शहापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. एच. राठोड यांनी शुक्रवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच आरोग्य विभागाकडून या प्रकाराची माहिती घेण्यात आली.

या घटनेनंतर परिसरात अन्नसुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असून उरलेले अन्न योग्य पद्धतीने साठवून ठेवण्याबाबत दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

विषबाधा झालेल्या रुग्णांची नावे
मंदा भालचंद्र भोईर (३६), हरी नामा भगत (५०), अलका हरी भगत (४५), गीता अशोक भोईर (४०), प्रिया अशोक भोईर (१७), अनुष्का अशोक भोईर (११), सुभाष बाळू भोईर (५३), मयूर सुभाष भोईर (२२), नितीन सुभाष भोईर (२४), हरी दाजी भोईर (६४), कविता किसन शिंगोळे (४२), राजश्री अनंता भोईर (४६), गणेश अनंता भोईर (१७), बाळू दाजी भोईर (८०), सुमन सुभाष भोईर (४२), मंदा भानुदास भोईर (५१), भानुदास भगवान भोईर (५१), कल्पेश भानुदास भोईर (२४), भालचंद्र भगवान भोईर (५१), अशोक बाळू भोईर (५२), अनंता हरी भोईर (६०) आणि अक्षता अशोक भोईर (१७).

25
1025 views

Comment