पालघर : जेएनपीए ते सफाळे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कार्यान्वित
पालघर : भारत सरकारच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी उभारलेल्या मालवाहतुकीसाठी राखीव लोहमार्गाचा पहिला टप्पा २५ मे रोजी कार्यान्वित केला गेला. जे एन पी ए ते सफाळे असा हा टप्पा महत्त्वाच्या बंदरांवर मालवाहतुकीसाठी गेम चेंजर मानला जात आहे. जे एन पी ए चे न्हावा शेवा येथील बंदर आणि पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण बंदर यांना देशातील विविध ठिकाणी जोडण्यासाठी हा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.
रेल्वे मंत्रालयाने २५ मे रोजी प्रसिद्धी माध्यमांतून या टप्प्याच्या कार्यान्वयनाची माहिती दिली. या प्रकल्पामुळे मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. प्रवासी आणि मालवाहतूक वेगळ्या मार्गांवर असल्यामुळे प्रवाशांच्या गाड्यांचे वेळापत्रक सुधारण्यात मदत होईल. या मार्गांवर गाड्या ताशी १०० किमी वेगाने धावू शकतात तसेच डबल-डेकर कंटेनर आणि १३,००० टन वजनाच्या मालगाड्या चालवण्यास विशेष व्यवस्था आहे. सध्या सुरू असलेला टप्पा वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरचा भाग असून, याचा एकूण लांबी १५०६ किमी असून जेएनपीटी (नवी मुंबई) ते दादरी (उत्तर प्रदेश) पर्यंत आहे.
महाराष्ट्रातील मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीए) ही दोन प्रमुख बंदरे आहेत. मुंबई बंदरात मर्यादित खोलीमुळे मोठ्या जहाजांसाठी मर्यादा आहेत. वाढवण येथील अरबी किनारा नवीन बंदरासाठी आदर्श स्थान असून त्यासाठी केंद्र सरकारने ७६,२०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. वाढवण बंदर पूर्ण झाल्यानंतर जगातील दहा सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक बनेल. या प्रकल्पाचे पहिले फेज २०२९ पर्यंत पूर्ण होणार आहे. वाढवण बंदराची रेल्वे आणि रस्ता जोडणीचा कामही सुरू असून, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाशी जोडणी केली जाणार आहे. या महामार्गामुळे पालघर ते नाशिकचा प्रवास ५ तासांऐवजी ९० मिनिटांत होईल. या जोडणीसाठी सुमारे १४,००० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यात युवकांना रोजगार व व्यवसाय संधी देखील उपलब्ध होतील.