पाटेठाण: राजेंद्र सुमंतराव हंबीर यांची विश्वव्यापी मानवधर्म आश्रम अध्यक्षपदी निवड
पाटेठाण (दौंड): विश्वव्यापी मानवधर्म आश्रमाचे रिक्त झालेले अध्यक्षपद आता श्री राजेंद्र सुमंतराव हंबीर (राजुकाका) सांभाळणार आहेत. आश्रमाच्या विश्वस्त मंडळाने एका विशेष बैठकीत त्यांच्या अध्यक्षपदी एकमताने निवड केली आहे. या निवडीमुळे आश्रमातील सामाजिक आणि अध्यात्मिक कार्य अविरतपणे पुढे चालू राहील.
आश्रमाचे अध्यात्मिक प्रमुख आणि माजी अध्यक्ष परमपूज्य गुरुवर्य श्री सुमंतबापूजी हंबीर यांचे १२ मे रोजी निधन झाले होते, ज्यामुळे अध्यक्षपद रिक्त झाले होते. राजेंद्र सुमंतराव हंबीर हे गुरुवर्यांच्या विचारांचे वारसदार असून त्यांनी आश्रमाच्या कार्यात दीर्घकाळ सक्रिय सहभाग घेतला आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी आणि आश्रमाच्या साधकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.