logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मोठा अनर्थ टळला !कसारा स्थानकात एक्सप्रेसच्या जनरेटर व्हॅन मधून धूर, प्रवाशामध्ये घबराट

शहापूर/साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकात गुरुवारी सकाळी महानगरी एक्सप्रेसच्या जनरेटर व्हॅनमधून अचानक धूर निघाल्याने काही काळ प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आणि तातडीच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.

रेल्वे प्रवासातील अडथळ्यांची शर्यत दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. लोकल तसेच एक्सप्रेस गाडी ही लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी या गाडीतून कामानिमित्त मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. इतर मार्गाने प्रवास करणे अधिक खर्चिक असल्याने प्रवासी रेल्वे वाहतुकीला प्राधान्य देतात. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्यावेळी लोकल गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते.

असे असताना गुरूवारी सकाळी १० ते १०.३० वाजताच्या दरम्यान इगतपुरीहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेली महानगरी एक्सप्रेस कसारा स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर पोहचली असताच जनरेटर व्हॅनमधून धूर येऊ लागला. हे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. काही क्षणांतच हा प्रकार लक्षात येताच स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, स्थानिक तांत्रिक पथक तसेच स्टेशन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील प्रवाशांना दूर करण्यात आले आणि जनरेटर व्हॅनची तपासणी सुरू करण्यात आली. प्राथमिक तपासणीत असे समोर आले की, अधिक उष्णतेमुळे ब्रेक लायनर गरम होऊन जाम झाल्याने धूर निर्माण झाला होता. ही तांत्रिक बिघाडाची स्थिती गार्डच्या लक्षात आली आणि त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. गार्डच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा धोका टळला.

रेल्वे तांत्रिक कर्मचाऱ्यांनी त्वरित संबंधित ब्रेक लायनर मोकळा करून आवश्यक दुरुस्ती केली. सुमारे १० ते १५ मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या प्रकारामुळे महानगरी एक्सप्रेस कसारा स्थानकावर सुमारे पंधरा मिनिटे थांबविण्यात आली होती. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर गाडी मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा प्रवाशांना दुखापत झाली नाही. मात्र अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

35
852 views

Comment