logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

१८ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर युनिव्हर्सल कन्स्ट्रक्शन मशिनरी कामगारांना दिलासा 288 आरोपींची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

सांगवी-शिरवळ येथील युनिव्हर्सल कन्स्ट्रक्शन मशिनरी कंपनीच्या कामगार युनियन प्रकरणात तब्बल 18 वर्षांनंतर अखेर कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाई येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने या बहुचर्चित प्रकरणातील सर्व 288 आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
“महाराष्ट्र शासन विरुद्ध प्रदीप नारायण भोसले व इतर” या नावाने 2008 पासून हा खटला न्यायप्रविष्ट होता. सुरुवातीला खंडाळा न्यायालयात दाखल झालेल्या या प्रकरणाची सुनावणी नंतर सातारा जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आली होती. अखेर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी. माने यांनी वाई येथील न्यायालयात या खटल्याचा निकाल जाहीर केला.
या प्रकरणात प्रदीप नारायण भोसले यांच्यासह एकूण 288 कामगार आणि युनियन पदाधिकाऱ्यांवर आरोप ठेवण्यात आले होते. आरोपींच्या वतीने सातारा येथील ॲड. विक्रम विठ्ठल काकडे, ॲड. युवराज पी. भोसले, ॲड. दिग्विजय पोळ तसेच वाई येथील ॲड. धुमाळ यांनी प्रभावी बाजू मांडली.
सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आलेल्या पुराव्यांची आणि साक्षीदारांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल देताना फिर्यादी पक्षाकडून आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे व ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आल्याचे नमूद केले. त्यामुळे सर्व आरोपींना दोषमुक्त करण्यात आले.
निकालानंतर न्यायालय परिसरात कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत आनंद साजरा केला. तब्बल 18 वर्षांच्या न्यायालयीन संघर्षानंतर मिळालेल्या या निर्णयामुळे कामगार वर्गातून सुटकेचा निःश्वास सोडण्यात आला.
या प्रकरणात कामगारांनी एकजुटीने लढा दिल्यामुळेच हा विजय शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. सदर केससाठी शेखर चव्हाण, नारायण सुतार, प्रमोद सणस, अमोल चव्हाण, प्रदीप भोसले, संतोष पाटील, जितेंद्र शिंदे आणि सुयोग सोनावणे यांनी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल सर्व कामगार मित्रांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

0
36 views

Comment