logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी अनिल चौधरी यांच्या नावाची जोरदार चर्चा; भुसावळ बैठकीत १०९ नगरसेवकांचा एकमुखी पाठिंबा

जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी अनिल चौधरी यांच्या नावाची जोरदार चर्चा; भुसावळ बैठकीत १०९ नगरसेवकांचा एकमुखी पाठिंबा दिला.

पाचोरा प्रतिनिधी :-
(जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी)

जळगाव जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून, आता भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नावाभोवती मोठे राजकीय समीकरण तयार होताना दिसत आहे. आज भुसावळ येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्हाभरातील नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी एकमुखी भूमिका घेत “अनिल चौधरी यांनीच विधान परिषद निवडणूक लढवावी” असा जोरदार आग्रह धरला.

विशेष म्हणजे, केवळ एका दिवसाच्या आमंत्रणावर तब्बल १०९ नगरसेवक उपस्थित राहिल्याने संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कोणत्याही अधिकृत पक्षीय बॅनरशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर नगरसेवक एका ठिकाणी जमा होणे ही स्वतःमध्ये मोठी राजकीय ताकद मानली जात आहे.

भुसावळ येथे झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील अनेक शहरांमधून नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये चाळीसगाव शहरातून १५, शेंदुर्णीतून ७, जामनेरमधून ४, नशिराबादमधून ८, वरणगावमधून ९, यावलमधून १५, फैजपूरमधून ९, रावेरमधून १०, बोदवडमधून ७ आणि भुसावळमधून तब्बल २० नगरसेवकांनी उपस्थिती लावली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नगरसेवक एका बैठकीसाठी येणे, ही अनिल चौधरी यांच्या मैत्री, संपर्क आणि राजकीय पकडीची ताकद मानली जात आहे.

बैठकीत उपस्थित असलेल्या नगरसेवकांनी जवळपास एकाच भूमिकेतून आपली मते मांडली. “अनिलभाऊ, तुम्ही पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरा… आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” अशी भावना अनेक नगरसेवकांनी व्यक्त केली. विविध पक्षांतील नगरसेवक उपस्थित असल्यामुळे या बैठकीने सर्वपक्षीय चर्चांना अधिक वेग दिला आहे.

काही नगरसेवकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “अनिल चौधरी हे केवळ भुसावळपुरते मर्यादित नेतृत्व नाही. जळगाव जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक शहरात त्यांचे मित्र, कार्यकर्ते आणि समर्थक आहेत. अनेक वर्षांपासून त्यांनी पक्षभेद न करता लोकांशी संपर्क ठेवला आहे. कार्यकर्त्यांना मदत करणे, सामाजिक कामात पुढे असणे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणे ही त्यांची मोठी ताकद आहे.”

बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आगामी राजकीय समीकरणांवरही सविस्तर चर्चा झाली. “जिल्ह्यातील नगरसेवकांना स्वतःचे नेतृत्व हवे आहे,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. काही नगरसेवकांनी तर “अनिल चौधरी हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे खरे प्रतिनिधी ठरू शकतात,” असे स्पष्ट मत नोंदवले.

विशेष म्हणजे, एका दिवसाच्या निमंत्रणावर १०९ नगरसेवक उपस्थित राहिल्याने पुढील बैठकीबाबत देखील मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पुढील पाच दिवसांत होणाऱ्या दुसऱ्या बैठकीत ३०० पेक्षा अधिक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित राहू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठा राजकीय स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बैठकीदरम्यान अनिल चौधरी यांनी उपस्थित नगरसेवकांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे मी निवडणूक लढणारच… पण यासाठी सर्वांची साथ आणि आशीर्वाद महत्त्वाचा आहे.” त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित नगरसेवकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.

अनिल चौधरी यांच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलायचे झाल्यास, ते गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. भुसावळ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले असून, जिल्हाभरातील विविध शहरांमध्ये त्यांचा मोठा मित्रपरिवार आणि प्रभाव असल्याचे मानले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक नगरसेवक आणि माजी पदाधिकाऱ्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांची ताकद केवळ एका शहरापुरती मर्यादित नसून संपूर्ण जिल्हाभर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच होत असते.

राजकीय जाणकारांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत नगरसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत एका दिवसात १०९ नगरसेवकांचा पाठिंबा मिळणे, हे आगामी राजकीय समीकरणांसाठी मोठे संकेत मानले जात आहेत.

या बैठकीनंतर आता संपूर्ण जिल्ह्यात एकच चर्चा रंगू लागली आहे “जळगाव विधान परिषद निवडणुकीत अनिल चौधरी मोठे गेमचेंजर ठरणार का?” आगामी काही दिवसांत होणाऱ्या पुढील बैठका, वाढता नगरसेवकांचा पाठिंबा आणि बदलती राजकीय समीकरणे यामुळे जळगाव विधान परिषद निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

4
159 views

Comment