logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कुंभमेळानाशिकमध्ये आरटीओची मोठी मोहीम; एकाच दिवसात १०८९ रिक्षाचालकांची तपासणी नाशिकमध्ये आरटीओची मोठी मोहीम; एकाच दिवसात १०८९ रिक्षाचालकांची तपासनी

राज्य शासनाने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान अनिवार्य केल्यानंतर, नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) शहरात धडक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. परिवहन विभागाच्या ‘वायू वेग पथकां’द्वारे (Flying Squads) शनिवार (दि. २३) रोजी नाशिक शहरातील विविध भागांत तब्बल १ हजार ८९ रिक्षाचालकांची कसून तपासणी करण्यात आली. या धडक मोहिमेमुळे रिक्षाचालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.


सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी चालकांचा थेट संबंध येतो. अनेकदा परप्रांतीय किंवा अमराठी चालकांमुळे संवाद साधताना प्रवाशांची (Passengers) गैरसोय होते. हाच सुसंवाद अधिक सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने मोटार वाहन नियमात बदल करत हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४, ७८ आणि ८५ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत सार्वजनिक सेवा वाहन चालविणाऱ्या चालकांसाठी मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान (‘वर्किंग नॉलेज’) अनिवार्य करण्याची तरतूद प्रस्तावित आहे.

राज्याच्या परिवहन आयुक्तांनी हा प्रस्ताव गृह विभागाकडे सादर केला असून, त्यानुसार मसुदा अधिसूचना काढण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात सुरू आहे.नवीन प्रस्तावित बदलांनुसार, आता परवाना प्राधिकरणाला (RTO) केवळ चालकाचे चारित्र्य आणि पार्श्वभूमी तपासून चालणार नाही, तर त्याच्या मराठी भाषेच्या ज्ञानाचीही तपासणी करावी लागणार आहे. मीटर असलेल्या मोटार कॅब (टॅक्सी) आणि ऑटो रिक्षा चालकांना परवाना मिळवण्यासाठी तसेच परवाना नूतनीकरणाच्या (License Renewal) वेळी मराठीचे ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे.यामुळे राज्यातील आणि विशेषतः नाशिकमधील रिक्षा व टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधणे भाग पडणार आहे.

१५ ऑगस्टची ‘डेडलाईन’; अन्यथा परवाना धोक्यात!

परिवहन विभागाने अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी १५ ऑगस्ट ही अंतिम मुदत (डेडलाईन) दिली आहे. या कालावधीत चालकांनी मराठी भाषेचे प्राथमिक ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. १६ ऑगस्टनंतर जे चालक नियमांचे उल्लंघन करताना आढळतील,किंवा ज्यांना मराठीचे व्यवहारिक ज्ञान नसेल,अशा चालकांवर आरटीओकडून दंडात्मक कारवाईसह परवाना निलंबनाची कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

नाशिकमध्ये वायूवेग पथके तैनात

नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या मोहिमेसाठी विशेष वायू वेग पथके तैनात केली आहेत. शहरातील मुख्य चौक, रिक्षा थांबे आणि गर्दीच्या ठिकाणी शनिवारी दिवसभर ही तपासणी मोहीम सुरू होती. केवळ परवान्यांची कागदपत्रे न तपासता, चालक प्रवाशांशी आणि अधिकाऱ्यांशी मराठीत बोलू शकतात की नाही, याची चाचपणी या मोहिमेदरम्यान घेण्यात आली. आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचे संकेत आरटीओ प्रशासनाने दिले आहेत.

तपासणी मोहिमेत नेमकं काय पाहिलं जातंय?

१. मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान: अमराठी चालकांना मराठीचे प्राथमिक ज्ञान (बोलणे आणि समजणे) आहे की नाही, याची जागेवरच खात्री केली जात आहे.
२. परवाना व बिल्ला (Permit & Badge): चालकाकडे वैध परवाना आणि आरटीओचा अधिकृत बिल्ला आहे का, याची तपासणी केली जात आहे.
३. गणवेश (Uniform): रिक्षाचालक विहित गणवेशात आहेत की नाही, यावरही पथके बारीक लक्ष ठेवून आहेत.

शहरातील ‘या’ प्रमुख परिसरांवर आरटीओचा वॉच
पंचवटी आणि निमूट परिसर: तीर्थक्षेत्र असल्याने येथे बाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. या भागात रामकुंड परिसर, निमाणी बस स्थानक, कट्या मारुती चौक आणि मखमलाबाद नाका येथे पथकांनी तपासणी केली.
नाशिक रोड परिसर: रेल्वे स्टेशन बाहेर परप्रांतीय प्रवाशांची मोठी वर्दळ असते. येथील रिक्षाचालक प्रवाशांशी मराठीत संवाद साधतात की नाही, याची तपासणी करण्यासाठी नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसर, दत्त मंदिर चौक आणि बिटको पॉईंट येथे विशेष मोहीम राबवली गेली.
मध्यवर्ती नाशिक (सीबीएस व मेहेर): शहराचे मुख्य केंद्र असलेल्या सीबीएस (CBS), मेहेर चौक, शालिमार आणि सारडा सर्कल या भागात प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असते. येथेही चालकांच्या परवान्यांसह भाषेचे ‘वर्किंग नॉलेज’ तपासण्यात आले.

12
657 views

Comment