पुण्यात भरदिवसा गोळीबार; बाळा मस्केची निर्घृण हत्या
पुणे: धनकवडी परिसरातील बालाजी नगर बस स्टॉपवर माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी आकाश मस्केचा भाऊ अक्षय बापू मस्के उर्फ बाळा मस्के (वय २६, रा. आंबेगाव पठार) याची भरदिवसा गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना पुणे शहराला हादरवणारी असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बाळा मस्के बस स्टॉपवर उभा असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक गोळीबार केला आणि त्याला जागीच ठार केले. या हल्ल्याला पूर्वनियोजन असल्याचा संशय असून, वनराज आंदेकर खून प्रकरणाचा बदला घेण्यासाठी हत्या झाल्याची चर्चा आहे. आंदेकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आकाश मस्के सध्या पोलीस कोठडीत असून, त्याच्या भावाला लक्ष्य केल्याची शक्यता तपासली जात आहे.
घटनेनंतर पुणे पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. शहरातील वाढत्या गँगवॉर आणि गुन्हेगारी घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे.