रायपूर पोलिसांची धडक कारवाई; तब्बल ९२ जिवंत काडतुसांसह २ गावठी कट्टे जप्त, ३ आरोपींना बेड्या!
बुलढाण्यात रायपूर पोलिसांची धडक कारवाई; तब्बल ९२ जिवंत काडतुसांसह २ गावठी कट्टे जप्त, ३ आरोपींना बेड्या!
बुलढाणा:
जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंत्रीकोळी गावात रायपूर पोलीस आणि अकोला दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) संयुक्तपणे एक मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे टाकलेल्या या दरोड्यात पोलिसांनी दोन देशी बनावटीची पिस्तूल, ४ मॅगझीन आणि तब्बल ९२ जिवंत काडतुसांसह ७ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वेगवेगळ्या जिल्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
गुप्त माहितीवरून रचला सापळा
पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (बुलढाणा) श्री सुधीर पाटील यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. १८ मे २०२६ रोजी अंत्रीकोळी (ता. चिखली) येथे काही इसम बेकायदेशीर घातक शस्त्रास्त्रांसह येणार असल्याची पक्की माहिती रायपूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष आर्म अॅक्टन्वये या ठिकाणी छापा टाकला.
XUV कार आणि आयफोनसह 'हा' मुद्देमाल जप्त
पोलिसांनी संशयित आरोपींची कसून झडती घेतली असता त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांचा साठा आढळून आला. पोलिसांनी त्यांच्याकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
दोन देशी बनावटीच्या पिस्टल (गावठी कट्टे) आणि ४ मॅगझीन
९२ जिवंत काडतुसे (Live Cartridges) आणि २ वापरलेली काडतुसे
एक लोखंडी चाकू
महिंद्रा कंपनीची XUV500 गाडी (क्र. MH 20 DJ 8687)
आयफोन १६ प्रो मॅक्स मोबाईल
या जप्त करण्यात आलेल्या संपूर्ण मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत ७,०५,०००/- रुपये आहे.
तीन आरोपी गजाआड; वेगवेगळ्या जिल्ह्यांचे कनेक्शन
या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली असून, हे आरोपी वेगवेगळ्या जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे:
१) शुभम सागर पवार (वय- वर्ष, रा. कारला चौक, वर्धा, जि. वर्धा)
२) रुपेश मिलन शिंदे (रा. हसनाबाद, ता. भोकरदन, जि. जालना; सध्या मुक्काम- पाचोरा, जि. जळगाव)
३) रोहेल मिलन शिंदे (रा. हसनाबाद, ता. भोकरदन, जि. जालना; robin सध्या मुक्काम- पाचोरा, जि. जळगाव)
गुन्हा दाखल अन् पुढील तपास सुरू
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनंत कळमकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रायपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक ९२/२०२६ अन्वये, भारतीय शस्त्र अधिनियम (आर्म्स अॅक्ट) कलम ३, ५, ७, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५(३) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कारवाई करणारी टीम:
सदरची महत्त्वपूर्ण कारवाई रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री निलेश सोळंके, पोहेका दशरथ शितोळे, पोहेका ज्योती गलबले, पोका राहुल जाधव, पोका अनंत कळमकर, पोका अख्तर शेख, पोका लक्ष्मण शिंदे, चालक पोहवा सागर कोरडे तसेच दहशतवाद विरोधी पथक (ATS) अकोला यांनी संयुक्तपणे यशस्वी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार निलेश सोळंके व पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंदे करत आहेत.