logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

NEET पेपरफुटी प्रकरण: 'RCC' चे सर्वेसर्वा प्रा. शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयकडून अटक; विशेष न्यायालयाकडून ९ दिवसांची कोठडी!

प्रकाश इंगळे,प्रतिनिधी-छत्रपती संभाजीनगर .१८ मे २०२६:
देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'नीट' (NEET-UG 2026) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रात 'लातूर पॅटर्न'चा प्रसिद्ध चेहरा आणि 'रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस' (RCC) चे संचालक प्रा. शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना सीबीआयने अखेर अधिकृतपणे अटक केली आहे. रविवारी (१७ मे) रात्री पुण्यातून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. आज, १८ मे रोजी त्यांना विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

मोबाईल फोनमध्ये सापडला लीक झालेला मूळ पेपर
सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सीबीआयच्या एका विशेष पथकाने लातूरमधील शिवनगर भागातील आरसीसीच्या मुख्य कार्यालयावर आणि इतर संशयास्पद ठिकाणांवर छापे टाकले होते. या झडतीदरम्यान सीबीआय अधिकाऱ्यांना शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेचा लीक झालेला मूळ पेपर आणि उत्तरपत्रिका आढळून आली. यापूर्वी सीबीआयने त्यांची ११ तास कसून चौकशी केली होती. या तांत्रिक आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे त्यांची गुन्ह्यातील संशयास्पद भूमिका स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

'१०१ प्रश्नांचा' तो व्हिडिओ ठरला कळीचा मुद्दा
मोटेगावकर यांच्या अटकेनंतर सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नीट परीक्षा संपल्यानंतरचा आहे, ज्यामध्ये मोटेगावकर परीक्षा देऊन आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत.

व्हिडिओमध्ये मोटेगावकर विद्यार्थ्यांना विचारतात, "आपल्या मॉक टेस्ट सिरीजमधून प्रश्न आले होते का?" यावर एक विद्यार्थी उत्तर देतो, "सर, तुम्ही जे १०१ प्रश्न दिले होते, हुबेहूब त्याच प्रश्नांमधून मुख्य परीक्षेत प्रश्न आले होते." आरसीसीच्या सराव परीक्षेत (Mock Test) मुख्य परीक्षेतील तब्बल ४२ हून अधिक प्रश्न 'जसेच्या तसे' आल्याचे तपासात समोर आल्यामुळे सीबीआयची शंका बळावली होती. हा व्हिडिओ आणि डिजिटल डेटा सीबीआयने पुरावा म्हणून जप्त केला आहे.

४० केंद्रांचे जाळे अन् करोडोंची उलाढाल सीबीआयच्या रडारवर
'RCC' इन्स्टिट्यूटचे महाराष्ट्रात लातूर, पुणे, नांदेडसह अनेक जिल्ह्यांत सुमारे ४० केंद्रांचे मोठे जाळे आहे. दरवर्षी जवळपास २०,००० ते ४०,००० विद्यार्थी येथे प्रवेश घेतात. या संपूर्ण कोचिंग नेटवर्कची वार्षिक उलाढाल १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सीबीआयने टाकलेल्या छाप्यात कॉम्प्युटर्स, लॅपटॉप, आयपॅड आणि अनेक संशयास्पद डिजिटल डेटा हस्तगत करण्यात आला आहे. लातूरमधील काही बडे डॉक्टर्स आणि त्यांचे कुटुंबीयही सीबीआयच्या रडारवर असून, आपल्या पाल्यांना पेपर मिळवून देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा सुगावा लागला आहे.

आंतरराज्य रॅकेट; पुण्यातूनही झाली होती अटक
नीट पेपरफुटीच्या या संघटित गुन्हेगारीत मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असल्याचा सीबीआयला संशय आहे. यापूर्वी सीबीआयने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या पेपर सेटिंग कमिटीची सदस्य आणि पुण्याच्या मॉडर्न कॉलेजची बायोलॉजी प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे आणि लातूरचे प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांना अटक केली आहे. कुलकर्णी आणि मोटेगावकर यांच्यातील संबंधांतूनच हा पेपर लीक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याशिवाय नांदेडमधील एका व्यापाऱ्याने आपल्या मुलीसाठी ५ लाख रुपयांना पेपर खरेदी केल्याचेही तपासात समोर आले आहे.

हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
शिक्षणाच्या बाजारात सुरू असलेल्या या काळ्या कारभाराचा पर्दाफाश झाल्याने प्रामाणिकपणे दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे भवितव्य आता टांगणीला लागले आहे. सीबीआय आता या प्रकरणाच्या मुळाशी जात असून, ९ दिवसांच्या कोठडीत मोटेगावकरांकडून या रॅकेटमधील आणखी कोणते मोठे मासे गळाला लागणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

10
308 views

Comment