logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरण लातूरचे प्रसिद्ध RCC संचालक शिवराज मोटे गावकर यांना सीबीआयकडून अटक धागेदोरे नांदेड पर्यंतनीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण: लात

विशेष प्रतिनिधी, पद्माकर हाडोळीकर नांदेड
वैद्यकीय प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नीट (NEET UG 2026) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने आता अत्यंत गंभीर वळण घेतले आहे. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या या घोटाळ्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत लातूर येथील नामांकित 'आरसीसी' (RCC - रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस) कोचिंग इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना अटक केली आहे. रविवारी झालेल्या प्रदीर्घ चौकशीनंतर सोमवारी (१८ मे २०२६) सीबीआयने ही मोठी कारवाई केली.
मोबाईलमध्ये आढळला लीक झालेला पेपर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने रविवारी लातूर येथील 'आरसीसी' इन्स्टिट्यूटच्या आवारात आणि मोटेगावकर यांच्या निवासस्थानी झाडाझडती घेतली होती. या छाप्यादरम्यान मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये 'नीट' परीक्षेचा लीक झालेला पेपर आढ आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याशिवाय कॉम्प्युटर्स, लॅपटॉप, आयपॅड आणि अनेक संशयास्पद कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. सीबीआयने यापूर्वी अटक केलेले प्रा. पी. व्ही. कुलकर्णी आणि मोटेगावकर यांचे जवळचे संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे.
धागेदोरे नांदेडपर्यंत; व्यावसायिकाच्या घरावर सीबीआयची धाड
या संपूर्ण पेपरफुटी रॅकेटचे धागेदोरे शेजारील नांदेड जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या एका पथकाने शनिवारी नांदेडमधील एका मोठ्या व्यावसायिकाच्या निवासस्थानी अचानक धाड टाकून तपास केला. सदर व्यावसायिकाने आपल्या मुलीसाठी तब्बल ५ लाख रुपये देऊन नीटचा पेपर खरेदी केल्याचा संशय सीबीआयला आहे. शनिवार संध्याकाळपर्यंत नांदेडमध्ये ही चौकशी आणि शोधमोहीम सुरू होती. या कारवाईमुळे नांदेडमधील शैक्षणिक आणि व्यावसायिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
कोचिंग क्लासेस परिसर आणि शहरात चोख पोलीस बंदोबस्त
मोटेगावकर यांच्या अटकेची बातमी समजताच लातूर आणि नांदेड परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात मोठे पडसाद उमटले आहेत. 'आरसीसी' संस्थेमध्ये दरवर्षी हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. संभाव्य कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून संबंधित कोचिंग क्लासेसचे मुख्य केंद्र, तसेच संवेदनशील भागात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सीबीआयच्या या धडक कारवाईमुळे महाराष्ट्रातील एज्युकेशन हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्याच्या शिक्षण क्षेत्रातील एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, यामध्ये आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

0
647 views

Comment