logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सत्यपाल महाराज वाढदिवस विशेष... प्रतिनिधी:-यवतमाळ

सत्यपाल महाराज वाढदिवस विशेष...
(यवतमाळ)

आई सुशीलाबाईंच्या ओठांवर सदैव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांच्या ओळी असायच्या. त्यांचं लेकरू मोठ्या कौतुकानं हे ऐकायचं. कधी कधी 'माय'सोबत गायचंदेखील. गुरूकुंज मोझरीच्या या ज्ञानवैभवानं त्याला प्रभावित केलं. त्यालाही गावंसं वाटायचं. खंजेरी विकत घ्यावीशी वाटायची.

पण अत्यंत गरिबीमुळे हे लेकरू काही करू शकत नव्हतं. मग फुटक्या मडक्यांच्या रिंगवर प्लास्टिकची पन्नी बांधली की झाली याची खंजेरी तयार. यावर थाप देत गुरूदेव हमारा प्यारा, है जीवन का उजियारा हे भजन सहज ओठांवर आलं. जीवन का उजियारा राष्ट्रसंतांच्या या शब्दांनी खरोखरंच या लेकराचं आयुष्य उजळलं.

हीच प्रकाशाची किरणं वाटत हा क्रांतिपुरुष गेल्या 50हून अधिक वर्षांपासून अनेकांच्या जीवनात उजियारा आणत आहे. अनेक भारावलेल्या विचारांनी हेच लेकरू मोठं होत गेलं. नाव सत्यपाल विश्वनाथ चिंचोळकर. त्यांना स्वतःहून महाराज हे बिरूद लावलेलं आवडत नाही. मात्र संपूर्ण जग त्यांना सत्यपाल महाराज म्हणूनच ओळखतात.

'माय'नंच दिलं नाव सत्यपाल

'माय' सुशीलाबाई आणि वडील विश्वनाथ यांच्या पोटी सत्यपाल महाराज यांचा जन्म झाला. सत्यपाल आईला 'माय' म्हणतात. अकोला जिल्ह्यातील शिरसोली हे त्यांचं जन्मगाव. जन्मलेल्या लेकराचं नाव काय ठेवायचं, हे विचारायला सुशीलाबाई ज्योतिष्याकडे गेल्या नाहीत. आपलं लेकरू सत्याच्या मार्गानं चालावं.

त्यानं सत्याचं पालन करावं, म्हणून लेकराचं नाव सत्यपाल ठेवलं. सत्यपाल यांनी ते नाव सार्थकी लावलं. बालपणापासूनच सत्यपाल यांच्यावर सत्याचेच संस्कार झालेत. ते त्यांच्या आचरणातून आणि प्रबोधनातून सहज दिसतात. सत्याचाच आग्रह धरणारे ते नव्या युगाचे सत्याग्रही आहेत.

लहानपण अत्यंत गरिबीत गेलं. नीट कपडेदेखील त्यांच्याकडे नसायचे. कुणी त्यांना भजनदेखील गाऊ देत नव्हते. सत्यपालांनी आपली चिकाटी सोडली नाही. ते भजन नियमित ऐकायचे. अगदी सूक्ष्म आणि बारीक असं निरीक्षण करायचे. बघता बघता यात ते तयारदेखील झालेत.

सप्तखंजेरीची जादू ....

सत्यपाल लहानपणापासूनच प्रयोगशील. राष्ट्रसंताची प्रेरणा होतीच. लहान वयातच पहिल्यांदा खंजेरी हातात. घेतली. एकेक करत खंजेरीची संख्या वाढवली. एकाचवेळी सात खंजेरी वाजवण्याचा अद्भूत पराक्रम त्यांनी केला. कुटुंबातील सदस्यांसह सगळेच अवाक झालेत. पुढे हेच त्यांच आकर्षण झालं.

सप्तखंजेरीवादक म्हणजेच सात खंजेरीवाले हे जगातले पहिले प्रबोधनकार ठरलेत. सोशल मीडियातून त्यांची सप्तखंजेरी जगभरात पोहचली. त्यानंतर पुढची एक नवी पिढी त्यांनी घडवली. त्यांना प्रेरणा दिली. सत्यपाल नावात पाल आहे.

त्यांचा आदर्श ठेवणारे संदीपपाल, रामपाल, पवनपाल, उदयपाल, आनंदपाल, पंकजपाल, संघपाल, कमलपाल, हृषिपाल, तुषार सूर्यवंशी, आकाश टाले, पवन दवंडे अशा अनेक युवकांनी सत्याच्या पालनाचा मार्ग धरला. ही माहिती मंगेश वानखडे यांनी बोलताना दिली.

पुरस्कारांच्या रकमेचं काय करतात

सत्यपाल यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेत. या पुरस्कारांची रक्कम ते विविध समाजपयोगी कामांसाठी कारणी लावतात. सुसंस्कार शिबिर, नेत्रतपासणी शिबिर, रंगपंचमीला स्मशानभूमी स्वच्छता आणि प्रबोधन असे अनेक उपक्रम ते नियमित घेतात. त्यांनी पुरस्कारात मिळालेल्या रकमेतून शिबिरार्थ्यांसाठी खोल्या बांधल्यात. येत्या पुरस्कारात मिळालेली रक्कम ते शवपेटिकेसाठी वापरणार आहेत.

आतापर्यंत त्यांना महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, शासनाचा दलितमित्र पुरस्कार, मानव समाज आकोटचा लोकरत्न पुरस्कार, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट नागपूरचा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार, संत संमेलन अंजनगावचा विदर्भरत्न पुरस्कार, सिरॉक इंडिया लि.चा राष्ट्रीय सेवाभावी पुरस्कार, ग्रामीण विकास प्रतिष्ठानचा समर्पित जीवन पुरस्कार, गुरूदेव युवामंच नागपूरचा राष्ट्रसंत सेवावृत्ती पुरस्कार,

सत्यशोधक समाज अकोल्याचा सत्यशोधक समाज मानपत्र, ग्रामगीता विश्व मोझरीचा धन्य गृहस्थाश्रम पुरस्कार, मराठा सेवा संघाचा सिंदखेड राजा येथे पुरस्कार, कला साहित्य अकादमी अहमदपूर, लातूरचा सेवा गौरव पुरस्कार, जे.सी.आय.चा विदर्भ गौरव पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा विदर्भ झाडीपट्टी सन्मान, शासनाचा शाहू महाराज स्मृतिचिन्ह, सामाजिक परिवर्तनाचा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार,

बिहार आणि सिक्कीमचे तत्कालीन गव्हर्नर महामहीम रा. सु. गवई यांच्याकडून गौरवपत्र, नाशिकच्या सम्यक वामनदादा कर्डक स्मृती संस्थेचा वादळवारा पुरस्कार, विदर्भ समाजसंघ मुंबईचा विदर्भरत्न पुरस्कार, शंकरअण्णा घोंगडे प्रतिष्ठानाचं गौरवपत्र, अकोल्याच्या नटश्रेष्ठ नीळू फुले आर्ट फाउंडेशनचं गौरवपत्र, धुळे जिल्ह्यातील साक्रीचा कमलताई मराठे पुरस्कार,

प्रतिभा सहित्यसंघाचा उदीम पुरस्कार, अंकुर साहित्यसंघाचा शिरसोली गावभूषण पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिकेचा समाजकार्य पुरस्कार, आम्ही सारे फाउंडेशनचा पुरस्कार, मराठा सेवा संघाचा विश्वभूषण पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा कीर्तन समाज प्रबोधन पुरस्कार, शासनाचा संत चोखामेळा पुरस्कार अशा अनेक पुरस्कार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार, सन्मान आणि गौरव त्यांना प्राप्त झालेत.

मानापमान नाट्य...

सायकलवरून त्यांनी आपली प्रबोधनयात्रा सुरू केली. पुढे बाईकवरून ते कितीतरी किलोमीटरचा प्रवास करायचे. नंतर फोर व्हिलर आली. महाराजांचा प्रवास हा लाखों किलोमिटरचा आहे. त्यांचे ड्रायव्हर राजेश काइंगे आणि सत्यपाल यांच भाऊ गजानन चिंचोळकर, सुनील चिंचोळकर, विजय बेदरकर हे नेहमी त्यांच्या सोबत असतात. आपल्या टीमची सत्यपाल खूप काळजी घेतात. त्यांच्या विमा पॉलीसीपासून आरोग्यापर्यंत सर्वच बाबींवर त्यांचं लक्ष असतं.

या प्रवासात अनेकदा मानापमानाच्या नाट्यांना त्यांना सामोरे जावे लागले. ते आपल्या कठोर वाणीतून समाजातील अनिष्ट रूढी आणि परंपरांवर ताशेरे ओढतात. त्यामुहे अनेकांचा रोष त्यांना आजही पत्करावा लागतो. काही गोष्टी ते आवर्जून करतात.

ज्या ज्या ठिकाणी ते जातात तिथल्या कर्तृत्त्वावान महिलांचा, वीरपत्नींचा साडी-चोळी देऊन सन्मान करतात. विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटतात. त्यांच्यासोबत एक प्रश्नोत्तरांचं सत्र चालतं. युवकांशी चर्चा करतात. राष्ट्रसंतांच्या कार्य आणि साहित्याकडे लोकांना आकर्षित करतात. गुरूकुंज मोझरीची महती ते वारंवार सर्वांना पटवून देतात.

त्यांचं सत्यानाश हे पुस्तक बरंच गाजलं. सत्यपालची सत्यवाणी हा त्यांचा कायक्रम तर जगप्रसिद्धच आहे. कोणतीही जाहिरात किंवा प्रचार-प्रसार न करताही हजारोंच्या संख्येने त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लागतेच. त्यांच्याच विचारपरंपरेतील रामपाल धारकर यांनी त्यांच्या कार्यावर प्रबोधनसम्राट हे पुस्तक लिहिलं.

फॅमिली बॉण्डिंग....

वयाची साठी क्रॉस केलेल्या सत्यपाल महाराजांचं 27 जणांचं एकत्र कुटुंब आहे. वडील गेल्यानंतर त्यांचं नेत्रदान त्यांनी केलं. त्यांच्या पत्नी सुनंदा यांचंदेखील त्यांनी देहदान केलं. स्वतःच्या देहदानाचाही त्यांनी संकल्प केलेला आहे. मानवता धर्माचं पालन करणारा असा गुणी पुत्र धर्मपाल डॉक्टर आहे. डॉ. धर्मपाल हेदेखील गरजूंना आरोग्यसेवा देतात. गुरुकुंज मोझरी येथे ते आपल्या टीमसह आरोग्य शिबिर घेतात.

फुले-शाहू-आंबेडकर, कर्मयोगी गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ. पंजाबराव देशमुख आदी महामानवांचे क्रांतीविचार ते समाजमनात पेरतात. या सर्व कटू औषधांना ते विनोदाच्या कॅप्स्यूलमधून लोकांच्या आत पोहचवतात. ग्रामगीताप्रणित तत्त्वांवर ते स्वतः चालतात. इतरांनाही ते या मार्गाला लावतात. त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना. १६ मे हा त्यांचा जन्मदिवस.

हॅपी बर्थडे, आदरणीय सत्यपाल महाराज

सुनील इंदुवामन ठाकरे
@ वणी, जि. यवतमाळ

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
589 views

Comment