धरणगाव तालुक्याला काळिमा! शाळेतच बालिकेचा अमानुष छळ करणाऱ्या विकृत शिक्षकाला धरणगाव पोलिसांकडून अटक
धरणगाव (प्रतिनिधी, मयूर कासार):
शाळेच्या पवित्र मंदिरात ज्ञानदानाचे काम करणाऱ्या एका शिक्षकानेच चिमुरड्या बालिकेवर अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना धरणगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या अमानुष छळाला वाचा फुटल्यानंतर, धरणगाव पोलिसांनी संशयित आरोपी शिक्षक नंदलाल मराठे याला तात्काळ गजाआड केले आहे. या विकृत कृत्यामुळे संपूर्ण तालुक्यातून तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.
वर्गात एकटे बोलावून अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित शिक्षक नंदलाल मराठे हा गेल्या दोन वर्षांपासून (जून २०२४ ते एप्रिल २०२६ दरम्यान) पीडित बालिकेचा छळ करत होता. शाळेच्या वेळेत तो पीडित मुलीला वर्गात एकटे बोलवायचा आणि मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर अत्याचार करायचा. हे कृत्य कोणाला सांगितल्यास तुझ्या आई-वडिलांना मारून टाकीन, अशी धमकी तो चिमुरडीला देत असल्याने पीडित मुलगी कमालीच्या दहशतीखाली होती.
सुट्ट्यांमध्ये नातेवाइकांकडे गेल्यावर फुटला वाचा
एप्रिल महिन्यात शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर पीडित बालिका तिच्या नातेवाइकांकडे गेली होती. तिथे काहीशा सुरक्षित आणि मोकळ्या वातावरणात आल्यावर तिने तिच्यासोबत घडलेला हा धक्कादायक आणि अमानुष प्रकार नातेवाइकांना सांगितला. मुलीची ही आपबिती ऐकून नातेवाइकांना प्रचंड धक्का बसला. त्यांनी तात्काळ मुलीच्या आईशी संपर्क साधून घडलेला सर्व प्रकार कानावर घातला.
नराधम शिक्षकाला तात्काळ अटक
या घटनेची माहिती मिळताच बालिकेच्या आईने तात्काळ धरणगाव पोलीस ठाणे गाठून नराधम शिक्षकाविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, संशयित आरोपी शिक्षक नंदलाल मराठे याला तात्काळ अटक केली आहे.
या घटनेमुळे धरणगाव तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत असून, समाजात शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या अशा विकृत मानसिकतेच्या शिक्षकाला कठोरात कठोर आणि फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून आणि सुजाण नागरिकांमधून केली जात आहे.