सातपूर गोळीबार प्रकरणी लोंढे टोळीला सशर्त जामीन मंजूर
सातपूर परिसरात झालेल्या गोळीबार आणि विविध गंभीर गुन्ह्यांनी चर्चेत आलेल्या लोंढे टोळीतील (Londhe Gang) सदस्यांना आता न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. या टोळीच्या एकूण नऊ सदस्यांना आतापर्यंत सशर्त जामीन मंजूर झाला असून, टोळीचा म्होरक्या प्रकाश उर्फ बॉस लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक लोंढे यांच्या जामीन अर्जावर शनिवारी (दि. १६) महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये सातपूर हद्दीतील ऑरा बारमध्ये झालेल्या गोळीबार, प्राणघातक हल्ले आणि खंडणीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली होती
या प्रकरणात टप्प्याटप्प्याने संशयितांना (Suspected) जामीन मिळाले आहेत. त्यानुसार, एप्रिल २०२६ मध्ये बार चालक संशयित बिपिन पुरुषोत्तम पटेल, संतोष शेट्टी पवार (उर्फ जल्लाद) आणि अमोल बाबासाहेब पगारे या तिघांना सर्वप्रथम जामीन मिळाला. तर, मे २०२६ मध्ये शुभम रामगीर गोसावी, निलेश श्रीकांत जोशी (उर्फ बम्स), देवेश गजानन शेरताटे, दुर्गेश संतोष वाघमारे, शुभम चंद्रकांत निकम आणि राहुल सत्यविजय गायकवाड या सहा जणांचा जामीन मंजूर झाला आहे. जामीन मंजूर करताना न्यायालयाने कडक अटी घातल्या असून, यातील काही संशयितांना नाशिक शहरात (Nashik City) येण्यास मनाई करण्यात आली आहे.
मोक्काचा फास आणि पोलीस कारवाई
नाशिक पोलीस आयुक्तालयाने लोंढे टोळीच्या संघटित गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाईचा प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर, पोलिसांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सविस्तर दोषारोपपत्र दाखल केले आहे. सध्या या प्रकरणाची नियमित सुनावणी न्यायालयात सुरू असून, रिपाइं जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक संशयित प्रकाश लोंढे यांच्यासह भूषण लोंढे, शुभम उर्फ भुऱ्या पाटील आणि वेदांत चाळगे यांच्यावर मोक्का खटल्याची टांगती तलवार आहे.
टोळीतील इतर संशयित
या गुन्ह्यात लोंढे टोळीच्या मोठ्या साखळीचा समावेश आहे. यात संशयित प्रिन्स सिंग, आकाश उर्फ अभिजीत अडांगळे, सनी उर्फ ललित विठ्ठलकर, निखिल निकुंभ, संदीप गांगुर्डे यांसारख्या अनेक संशयितांवर विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. टोळीचा मुख्य संशयित प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे यांच्या जामिनावर न्यायालय काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण सातपूर परिसर आणि पोलिस दलाचे लक्ष आहे.