आसनगाव ते कसारा प्रवास होणार खडतर! कसारा इगतपुरी विभागात विशेष वाहतूक ब्लॉक लोकल सेवा प्रभावित!!
शहापूर साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे कसारा-इगतपुरी विभागात पायाभूत कामे करण्यासाठी, सहा दिवसांचा ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉकमुळे सीएसएमटी ते कसारा लोकल सेवा उपलब्ध नसेल. परिणामी, आसनगाव ते कसारा प्रवास खडतर होणार आहे. या प्रवासासाठी प्रवाशांना जादा पैसे खर्च करून पर्यायी वाहनांचा वापर करावा लागेल.
कसारा-इगतपुरी विभागात ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचइ) संदर्भातील इनफ्रिंजमेंट हटविण्याच्या पूर्वतयारीच्या कामासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक १७ ते २२ मे दरम्यान दररोज दुपारी ३.५० ते सायंकाळी ५.५० या वेळेत दोन तासांसाठी घेण्यात येणार आहे.
इगतपुरी-कसारा अप, डाऊन मुख्य मार्गिका आणि मध्यम मार्गिकेवर १७ मे रोजी ब्लॉक राहणार असून, १८ ते २२ मे दरम्यान अप, डाऊन मुख्य मार्गिका, मध्यम मार्गिका तसेच यार्ड मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे रविवारी काही मेल आणि एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.ब्लॉक कालावधीत, म्हणजेच १७ ते २२ मे या कालावधीत आसनगाव ते कसारा दरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे काही कसारा-सीएसएमटी लोकल आसनगावपर्यंतच धावतील, तर काही लोकल आसनगाव येथूनच सुटतील. सीएसएमटी-कसारा लोकलपैकी दुपारी १.१०, दुपारी २.१७, दुपारी २.४६ या लोकल आसनगाव येथेच थांबवण्यात येणार आहेत. तर कसारा-सीएसएमटी दुपारी ३.३५, दुपारी ४.४६, सायंकाळी ५.०२ या लोकल आसनगाव येथून त्याच्या निश्चित वेळेनुसार सुटतील.
ब्लॉकपूर्वी कसाऱ्याकडे जाणारी शेवटची लोकल ही दुपारी १२.३० वाजता सीएसएमटीहून सुटेल. तर, सीएसएमटीकडे येणारी शेवटची लोकल ही दुपारी २.४२ वाजता कसाऱ्यातून रवाना होईल. ब्लॉकनंतर कसाऱ्याकडे जाणारी पहिली लोकल दुपारी ४.५० वाजता सीएसएमटीहून सुटेल, तर सीएसएमटीकडे येणारी पहिली लोकल सायंकाळी ६.१७ वाजता कसाऱ्यातून रवाना होईल.
गाडी क्रमांक ११०७१ लोकमान्य टिळक टर्मिनस-बलिया कामायनी एक्सप्रेस ही गाडी नियोजित वेळेपेक्षा उशिरा, दुपारी ३.३० वाजता सुटणार आहे. तसेच काही रेल्वेगाड्यांचे नियमन करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक १३२०२ एलटीटी-राजगीर एक्सप्रेस आटगाव येथे, गाडी क्रमांक १२१३९ सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस खडवली येथे, तर गाडी क्रमांक १२१४३ एलटीटी-सुलतानपूर एक्सप्रेस टिटवाळा येथे काही काळ थांबवण्यात येणार आहे.गाडी क्रमांक २२२२१ राजधानी एक्सप्रेस ही ब्लॉकनंतर धावणारी पहिली रेल्वेगाडी असेल आणि तिला खर्डी येथे नियमन करण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान गाड्यांच्या बनचिंगमुळे गाडी क्रमांक १२१७३ उद्योगनगरी एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक ११००१ नंदीग्राम एक्सप्रेस या रेल्वेगाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे.