कळवा वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई; पाठलाग करून संशयित 'क्रेटा' गाडी पकडली
ठाण्यातील कळवा वाहतूक उपविभागाच्या पोलिसांनी विटावा परिसरात नाकाबंदी दरम्यान एका संशयित कारचा थरारक पाठलाग करून ती जप्त केली आहे. सदर गाडी चोरीची असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, चालक गाडी सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
नेमकी घटना काय?
कळवा वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विटावा ट्रॅफिक ऑफिससमोर पोलिसांकडून नाकाबंदी सुरू होती. यावेळी KA 24 M 8261 या क्रमांकाची हुंदाई 'क्रेटा' गाडी संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तिला थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने गाडी न थांबवता वेगाने पळवून नेली.
पोलिसांनी केला थरारक पाठलाग
गाडी न थांबल्याने कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकाने तत्काळ या गाडीचा पाठलाग सुरू केला. पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्याचे पाहून चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि अंधाराचा फायदा घेऊन तिथून पळ काढला. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता, ती चोरीची असल्याचे समोर आले आहे.
या पथकाने केली कारवाई:
या यशस्वी कामगिरीत पोलीस हवालदार सोनवणे (ब.नं. 7934), महिला पोलीस हवालदार चव्हाण (ब.नं. 4245), पोलीस हवालदार पाटील (ब.नं. 6523), पोलीस शिपाई वैद्य (ब.नं. 4868), पोलीस शिपाई मनवर (ब.नं. 1539) तसेच संदीप वैद्य, अशोक बोडके आणि महेश हळदणकर यांचा समावेश होता.
जप्त केलेली क्रेटा गाडी सध्या विटावा ट्रॅफिक ऑफिस येथे जमा करण्यात आली असून, पसार झालेल्या चालकाचा शोध पोलीस घेत आहेत. वाहतूक पोलिसांच्या या सतर्कतेमुळे चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला असून परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.