logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

एनएचएमला फक्त सहा महिन्यांची मुदतवाढ; कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण

वर्धा/प्रतिनिधी: राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवेला केवळ सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी अनेक पदांसाठी पाच वर्षांच्या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्याची पद्धत असताना, यावेळी अचानक फक्त सहा महिन्यांचीच वाढ मंजूर करण्यात आल्याने भविष्यासंदर्भात अनिश्चितता वाढली आहे.

राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये एनएचएम अंतर्गत डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, डेटा ऑपरेटर तसेच इतर आरोग्य कर्मचारी करार पद्धतीवर कार्यरत आहेत. कोरोना काळात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या या कर्मचाऱ्यांना दीर्घकालीन स्थैर्य मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रशासनाच्या नव्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

कर्मचारी संघटनांच्या मते, वारंवार अल्प मुदतीच्या करारामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक तणाव वाढत असून, सेवाशाश्वतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाच वर्षांवरून थेट सहा महिन्यांची मुदतवाढ देणे हा धक्कादायक निर्णय आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक आणि कौटुंबिक नियोजनही अडचणीत येणार आहे, अशी प्रतिक्रिया काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आरोग्य विभागाकडून निधी उपलब्धता व प्रशासकीय प्रक्रियेच्या कारणास्तव तात्पुरती सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पुढील कालावधीबाबत शासन स्तरावर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या निर्णयामुळे एनएचएम कर्मचाऱ्यांमध्ये भवितव्याबाबत चिंता वाढली असून, शासनाने लवकरात लवकर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.

1
892 views

Comment