राष्ट्रीय लोकअदालतीत 912 प्रकरणांचा आपसी तडजोडीने निपटारा
3 कोटी 33 लक्ष 29 हजार 658 रुपये तडजोड मूल्य
राष्ट्रीय लोकअदालतीतून चार जोडप्यांचे संसार सावरले
वर्धा, (महाराष्ट्र) : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशान्वये जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 912 प्रकरणे आपसी तडजोडीने सोडविण्यात आली. या प्रकरणांचे तडजोड मूल्य 3 कोटी 33 लक्ष 29 हजार 658 इतके आहे.
राष्ट्रीय लोकअदालतमध्ये दोन्ही पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळते तसेच दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणांमध्ये तडजोड होत असल्याने निकालाचे समाधान दोन्ही पक्षकारांना असते. यामुळे पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होऊन मनासारखा समझोता झाल्याने मानसिक समाधान मिळते, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड तसेच जिल्हा न्यायाधीश -1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ए.एस.एम.अली यांनी राष्ट्रीय लोकअदालत प्रसंगी सांगितले.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली निघणाऱ्या प्रकरणांमुळे पक्षकारांना समाधान लाभते. कारण दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणामध्ये समझोता होत असतो. त्यामुळे वादापेक्षा समझोता बरा या विचारानुसार पक्षकारांनी आपसातील वाद सामोपचाराने लोक अदालतीमध्ये मिटवावा, असे राष्ट्रीय लोक अदालतीची भुमिका विषद करतांना विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख यांनी सांगितले
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणांपैकी 769 इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. या तडजोड झालेल्या प्रकरणांमधील तडजोडीची रक्कम 2 कोटी 65 लाख 84 हजार 711 रुपये इतकी आहे. तसेच जिल्ह्यातील न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या कौटूंबिक हिंसाचाराच्या 4 प्रकरणांमध्ये पती पत्नी मध्ये असलेले वाद या लोक अदालतीद्वारे निपटारा करण्यात आले.
वाद दाखल पुर्व प्रकरणांपैकी 143 इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रकरणामधील तडजोडीचे मुल्य 67 लाख 44 हजार 947 इतके आहे. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व वाद दाखल प्रकरणे मिळून एकुण 912 इतकी प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली निघाली असून प्रकरणातील एकूण तडजोडीचे मुल्य 3 कोटी 33 लाख 29 हजार 658इतके आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख यांनी दिली आहे