सिनेस्टाईल चोराचा पाठलाग, अंगावर कार घातली, तरीही वाहतूक पोलिसांनी पकडली चोरीची कार
शहापूर साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
कापूरबावडी वाहतूक विभागाच्या पोलीस हवालदाराने सिनेस्टाईल पाठलाग करत बेळगाव येथून चोरी करून आणलेली कार जप्त केली. आरोपीने पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न करत पळ काढला, मात्र पोलिसांनी दुचाकीवरून तब्बल सात ते आठ किलोमीटर पाठलाग करत वाहन अडवले. आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाला.
बेळगाव भागातून दोन कार चोरीला गेल्या. याबाबत कार मालकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना चकवा देण्यासाठी या चोरट्यांनी टोल रस्त्याऐवजी अंतर्गत रस्त्यावरून प्रवास केला. टोल नाक्यावरील कॅमेऱ्यात त्याचे चित्रीकरण आले नाही. त्याचबरोबर
चोरीला गेलेल्या कारमधील जीपीएस ट्रॅकिंगच्या आधारे पोलीस तपास करत होते. त्यात संबंधित वाहने ठाण्याच्या दिशेने येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने ही माहिती ठाणे पोलिसांना कळवली. माजीवडा येथील गोल्डन क्रॉस परिसरात ड्रंक अँड ड्राईव्ह नाकाबंदी सुरू असताना वाहतूक नियंत्रण कक्षाकडून कापूरबावडी वाहतूक विभागाला याबाबत संदेश प्राप्त झाला.ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर सांगावे, पोलीस अंमलदार अश्रू हाके आणि त्यांच्या पथकाने माजिवडा जंक्शन परिसरात सापळा रचला. संशयित कार थांबवण्याचा प्रयत्न होताच चालकाने थेट पोलिसांच्या अंगावर कार घालत घोडबंदर रोडच्या दिशेने पळ काढला.
यावेळी पोलीस अंमलदार अश्रू हाके यांनी प्रसंगावधान राखत एका डिलिव्हरी बॉयची पल्सर दुचाकी घेऊन आरोपीचा पाठलाग सुरू केला. मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ मार्गे विजय गार्डन मेट्रो स्टेशनपर्यंत तब्बल आठ किलोमीटर हा थरारक पाठलाग सुरू होता. आरोपीने पळताना माजीवडा तसेच कापूरबावडी भागात अनेक वाहनांना धडक दिली तसेच पोलिसांना उडवण्याचाही प्रयत्न केला.