लाच स्वीकारणारा मंडळाधिकारी जाळ्यात
जळगाव : शेतात अवैधरीत्या खोदकाम करीत असल्यांच्या तक्रारी अर्जाची चौकशी बंद करण्यासाठी ५० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी नशिराबादचे मंडळ अधिकारी मिलिंद प्रकाश देवरे (३७, रा. रणछोडदास नगर, जळगाव) यांच्यासह सुरेश प्रल्हाद अहिरे (३९, रा. विद्यानगर, पिंप्राळा) या खासगी पंटरवर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. ही कारवाई १२ मे रोजी पिंप्राळा तलाठी कार्यालयासमोर करण्यात आली.
मंडळ अधिकारी मिलिंद देवरे यांनी तक्रारदाराकडे अर्जाची चौकशी बंद करण्यासाठी दि. १२ मे रोजी १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती लाचेची रक्कम ५० हजार रुपये स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले. ५० हजारांची रक्कम ठरल्यानंतर ते पैसे खासगी पंटर सुरेंद्र अहिरे याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार पिंप्राळा तलाठी कार्यालयासमोर लाचेची रक्कम स्वीकारतांना खासगी पंटर अहिरेला नाशिकच्या पथकाने रंगेहाथ पकडले.