logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

उमेद अभियानातील पशूसखीने गाठले यशाचे शिखरउमेदच्या नई किरण प्रकल्पातून सोनम रमधम दहावी उत्तीर्ण; ७०.८० टक्के गुणांसह तालुक्यात ठरल्या प्रेरणास्थान..!

Writing
उमेद अभियानातील पशूसखीने गाठले यशाचे शिखर
उमेदच्या नई किरण प्रकल्पातून सोनम रमधम दहावी उत्तीर्ण; ७०.८० टक्के गुणांसह तालुक्यात ठरल्या प्रेरणास्थान
मुर्ती प्रतिनिधी | काटोल
जिद्द आणि चिकाटी असेल तर वय हे यशाच्या आड येत नाही, हे काटोल तालुक्यातील धोतीवाडा येथील सोनम रमधम (ढोबाळे) यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) राबविण्यात येणाऱ्या नई किरण प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी दहावीच्या परीक्षेत तब्बल ७०.८० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे उमेद अभियानात कार्यरत महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
धोतीवाडा येथील ३७ वर्षीय सोनम रमधम या गृहिणी असून त्या उमेद अभियानात पशूसखी म्हणून कार्यरत आहेत. गावातील जनावरांचे आरोग्य, लसीकरण आणि पशुसंवर्धनाची जबाबदारी त्या प्रामाणिकपणे सांभाळतात. घरातील जबाबदाऱ्या, दोन मुलींचा सांभाळ आणि कामाचा व्याप सांभाळताना शिक्षण अपूर्ण राहिल्याची खंत त्यांच्या मनात कायम होती.
नई किरण ठरला आशेचा किरण
शाळा सोडलेल्या महिलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उमेद अभियानांतर्गत नई किरण हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाची माहिती मिळताच सोनम यांनी पुन्हा शिक्षण घेण्याचा निर्धार केला. दिवसभर पशूसखीचे काम, घरकाम आणि मुलींचा अभ्यास घेत स्वतःही रात्री अभ्यास करण्याची कसरत त्यांनी केली. त्यांच्या अथक मेहनतीचे फळ म्हणून त्यांनी दहावीच्या परीक्षेत ७०.८० टक्के गुण मिळवत यशाचे शिखर गाठले.
ग्रामीण महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण
सोनम रमधम यांचे हे यश केवळ वैयक्तिक नसून ग्रामीण भागातील त्या महिलांसाठी प्रेरणादायी आहे ज्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. शिक्षण घेण्याचे कोणतेही वय नसते, फक्त जिद्द आणि मेहनत असावी लागते, हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल उमेद अभियानाचे ब्लॉक मिशन अधिकारी दिनेश ढोके, तालुका व्यवस्थापक योगेश सरोदे, प्रभाग समन्वयक नरेंद्र हेलोंडे, शुद्धोधन गराडकर, मनोज कारडमारे, अतुल ढोके, राजू नागपुरे तसेच कोंढाळी सर्कलच्या आत्मनिर्भर प्रभाग संघातील ग्रामसखी, प्रभाग अध्यक्ष, सचिव आणि धोतीवाडा ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
घरकाम, मुलांचा सांभाळ आणि पशूसखी म्हणून कर्तव्य बजावताना अभ्यास करणे कठीण होते. मात्र नई किरण प्रकल्पाने मला नवी उमेद दिली. आजच्या यशामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे.
सोनम रमधम (यशस्वी विद्यार्थिनी)

13
524 views

Comment