logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

चार वर्षांत महाराष्ट्रात ५०० हून अधिक सत्यशोधक विधी : अरविंद खैरनार२३ व २४ मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय अभ्यासवर्ग : राजेंद्र वाघ

धरणगाव : येथील मोठा माळीवाडा समाज सभागृहात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा जागर, सामाजिक प्रबोधन आणि सत्यशोधक चळवळीचा प्रसार हा या सभेचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी प्रास्ताविकातून संघाच्या गेल्या चार वर्षांतील कार्याचा आढावा घेतला. यामध्ये सत्यशोधक विवाह, दशपिंड विधी, गृहप्रवेश, साक्षगंध सोहळे तसेच सत्यशोधक विधीकर्ते प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू असल्याची माहिती दिली.
तत्पूर्वी संत सावता महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अरविंद खैरनार होते. प्रमुख अतिथी म्हणून मोठा माळीवाडा समाजाध्यक्ष व्ही. टी. माळी, लहान माळीवाडा समाजाध्यक्ष रामकृष्ण महाजन उपस्थित होते. मान्यवरांचा शाल व महापुरुषांचे ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी व्ही. टी. माळी यांनी सत्यशोधक समाज संघाच्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करत, समाजातील युवकांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात अरविंद खैरनार यांनी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा इतिहास उलगडून सांगत, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी अज्ञान, अंधश्रद्धा, जातीय भेदभाव आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रभर ५०० हून अधिक सत्यशोधक विवाह, दशपिंड विधी, गृहप्रवेश आणि साक्षगंध सोहळे पार पडले आहेत. बहुजन समाजाने कर्मकांड आणि अंधश्रद्धेपासून दूर राहून सत्यशोधक विचार आत्मसात करावेत, महापुरुषांचे साहित्य घरोघरी पोहोचवावे आणि वाचन संस्कृती वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभर निबंध, वक्तृत्व, चित्रकला, प्रश्नमंजुषा स्पर्धा, रक्तदान शिबिरे, पुस्तक प्रकाशन, वृक्षारोपण आणि कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण अभ्यासवर्ग अशा विविध सामाजिक-शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी सत्यशोधक समाज संघाचे कार्यकर्ते राजेंद्र वाघ यांनी २३ व २४ मे २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देत, जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. सभेत सत्यशोधक समाज संघाने शेतकऱ्यांच्या वजा उत्पन्न दाखला संदर्भातील न्यायालयीन लढ्यात मिळविलेल्या यशाचाही उल्लेख करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुनील घनशाम सोनार यांना अभिष्टचिंतनानिमित्त गुलामगिरी हा ग्रंथ भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच त्यांनी उपस्थितांना गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? हा ग्रंथ भेट दिला. कार्यक्रमास नगरसेविका ज्योती पाटील, नगरसेवक परमेश्वर महाजन, लक्ष्मण महाजन, जेष्ठ पत्रकार कडू महाजन, एस. डब्ल्यू. पाटील, राजेंद्र माळी, शिवदास महाजन (एरंडोल), सुनिल सोनार, कैलास पवार, वासुदेव महाजन, सुनील देशमुख, आप्पी महाजन, निलेश पवार, निवृत्ती माळी, दिपक माळी, भटूलाल महाजन, भैय्या धनगर, हेमंत माळी, प्रिती पाटील, ललिता वाघ यांच्यासह बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. डी. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन आर. डी. महाजन यांनी मानले. सभा यशस्वीतेसाठी आबासाहेब राजेंद्र वाघ, लक्ष्मणराव पाटील, कैलास वाघ आणि जयेश माळी यांनी विशेष सहकार्य केले.

7
2449 views

Comment