शहापूरच्या जिल्हा परिषद शाळेतील जीत पाटीलची ठाणे जिल्ह्यातून बंगळूरच्या राष्ट्रीय मिलिटरी शाळेत निवड
शहापूर साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अल्याणी शाळेतील विद्यार्थी १२ वर्षाचा जीत पाटील याची ठाणे जिल्ह्यातून बंगळुरूच्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये निवड झाली आहे. जिल्ह्यातून या स्कूलसाठी निवड झालेला तो एकमेव विद्यार्थी आहे. खडतर, आव्हानात्मक असलेल्या या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेत अनेक विद्यार्थी पहिल्याच टप्प्यात बाद होतात. परंतु या सर्व आव्हानांना तोंड देत जीत (१२) याने या निवड प्रक्रियेत यशस्वी होण्याचा मान पटकावला आहे.
जीत पाटील हा ठाणे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चंद्रकांत पाटील आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. ठाणे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन जीत याने ही मजल मारल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे. शालेय जीवनापासून जीतने राष्ट्रीय सेवेचा भाग म्हणून लष्करी सेवेत जाण्याचे मनाने ठरवले होते. त्याच्या पालकांनीही त्याला उत्तेजन देऊन त्याची मानसिकता लष्करी सेवेसाठी तयार केली होती.
स्वताजवळील दुर्दम्य इच्छाशक्ती, आई, वडील, शिक्षिका,शाळेतील शिक्षकवृंद, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी, याशिवाय शहापूरच्या नाॅलेज ॲकेडमीचे सचिव अरूण पाटील आणि इतर सर्व पदाधिकारी, सदस्य, आयकॅन इन्स्टिट्यूट,सातारा यांचे मार्गदर्शन त्याला मिळाले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, शहापूर गट शिक्षणाधिकारी यांचे मार्गदर्शन मिळाले. ध्येय, जिद्द आणि अभ्यासातील सातत्य यांच्या संगमातून जीतने ही बाजी मारली आहे.राष्ट्र सेवा कार्यातील महत्वाच्या आणि सर्वोच्च काठीण्य पातळी असणाऱ्या राष्ट्रीय मिलिटरी शाळेच्या प्रवेश परीक्षेत जीतला १५० पेैकी १३६ गुण मिळाले आहेत. नॅशनल टेस्टींग एजन्सीद्वारे घेतल्या जाणाऱ्या ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत त्याला ३०० पैकी २८४ गुण मिळाले आहेत. जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेत ठाणे, पालघर जिल्ह्यातून ९७.५ टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. एकाच वर्षात तीनही लागोपाठ झालेल्या केंद्रीय प्रवेश परीक्षांमध्ये त्याने हे यश संपादन केले. प्रवेश परीक्षा जीतने राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या राजस्थान अजमेर येथे झालेल्या गटसमुह मुलाखतीत यश मिळवले.मिलिटरी हॉस्पिटल, खडकी येथील वैद्यकीय चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर त्याची बंगळुरू येथील निवड अंतीम झाली. देशसेवेसाठी जबाबदार नागरिक व अधिकारी घडविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाकडून राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचा उपक्रम राबविला जातो. या देशभरात केवळ पाच शाळा आहेत. यावर्षी देशाभारतील ३६५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असून त्यात फक्त ३६ सिव्हिलियन्स विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा अल्याणीच्या जीतचा त्यात समावेश आहे. ठाणे जिल्हा परिषद गुणवत्तापूर्ण शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या यशस्वीतेसाठी विविध उपक्रम राबवत आहे. अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक व नवोदय विद्यालय प्रवेशपात्र होत आहेत. यात शहापूर तालुका नेहमीच अव्वल राहिला आहे, असे शहापूर तालुका नाॅलेज ॲकेडमीचे सचिव अरूण पाटील यांनी सांगितले.