खर्डी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न; १ हजार ७६४ नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ
शहापूर साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात मार्च ते मे २०२६ या कालावधीत "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश महसूल विभागातील विविध सुधारणा आणि शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे हा आहे. याच उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर तालुक्यातील खर्डी महसूल मंडळ स्तरावर भव्य समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शुक्रवार, दिनांक ८ मे २०२६ रोजी खर्डी येथील दिलीप विनायक अधिकारी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आवारात हे शिबिर पार पडले.या विशेष शिबिरासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यामध्ये खर्डीचे माजी सरपंच व प्रतिष्ठित नागरिक श्री. दिलीप अधिकारी, श्री. फारूक मेमन यांच्यासह शहापूरचे निवासी नायब तहसिलदार श्री. शंकर डामसे, महसूल नायब तहसिलदार श्री. दत्तात्रय बांबळे, उपअधीक्षक भूमी अभिलेख श्री. शरद काळे आणि खर्डीचे मंडळ अधिकारी श्री. अजय आरबाड व सर्व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी नायब तहसिलदार श्री. शंकर डामसे व श्री. दत्तात्रय बांबळे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला आणि या अभियानाचे महत्त्व विषद करतानाच त्यांना योग्य मार्गदर्शनही केले.
दिवसभर चाललेल्या या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांच्या वतीने एकाच छताखाली शेकडो प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यात आला. शिबिराच्या आकडेवारीनुसार, एकूण १ हजार ७६४ नागरिकांना विविध दाखले व सेवांचे वाटप करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक ७६३ डिजिटल ७/१२ उतारांचे वाटप झाले, तर १४७ नागरिकांना ८ अ उतारा देण्यात आला. शैक्षणिक व इतर कामांसाठी लागणारे ३४३ उत्पन्न दाखले, ३७ जातीचे दाखले, ३९ नॉन-क्रिमिलेअर आणि १० अधिवास प्रमाणपत्रेही यावेळी प्रदान करण्यात आली. महसूल विभागाच्या 'जिवंत ७/१२ मोहीम' उपक्रमांतर्गत २८५ अद्ययावत अभिलेख उपलब्ध करून देण्यात आले.
केवळ महसूलच नव्हे, तर सामाजिक न्याय व आरोग्य विभागाच्या योजनांचाही लाभ नागरिकांना देण्यात आला. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे २५ लाभार्थी, ५ विधवा निवृत्तीवेतन योजना, ५ अपंग निवृत्तीवेतन योजना आणि श्रावणबाळ व वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय ४५ नवीन शिधापत्रिका, २० आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती आणि १९ आयुष्मान भारत कार्डांचे वाटप करण्यात आले. या यशस्वी उपक्रमामुळे नागरिकांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या शासकीय कामांचा जागीच निकाल लागल्याने खर्डी परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.