बालनाट्य शिबिर उत्साहात संपन्न!
नवी मुंबई, प्रतिनिधी :
संत शिरोमणी कला मंच व नवी मुंबई बालरंगभूमी आयोजित २५ एप्रिल ते ६ मे २०२६ या कालावधीत बालनाट्य अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ४५ विद्यार्थ्यांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेतला. २९ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
समारोप समारंभाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शिबिरार्थींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कुमारी वैष्णवी थोरात हिने शिबिरातील अनुभव कथन करताना सांगितले की, या शिबिरात अभिनयाचे अनेक धडे शिकायला मिळाले. हे शिबिर कायम आठवणीत राहील. सरांचे शिकवणे खूप आवडले आणि येथे खूप नवीन मित्र जोडले गेले.
उपस्थित सर्व पाहुण्यांचे तुळशीचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबिरार्थी कु. हर्षिका आंबे हिने केले. प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय शिबिराचे मार्गदर्शक श्रीहरी पवळे यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन कु. प्रिशा खरात हिने केले.
बारा दिवसांच्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी अभिनयाचे विविध धडे घेतले आणि अनेक बालनाटिका सादर केल्या. त्यामध्ये खायपदार्थांची जत्रा, रोबोट, शूटिंग शूटिंग, राजा राणी, रूम नंबर १०१ आणि शेवटी मिले सुर मेरा तुम्हारा या बालनाटिकांचा समावेश होता. या सादरीकरणांनी उपस्थित पालकांची मने जिंकली. बालनाटिकांना सुंदर पार्श्वसंगीत राहुल अहिरे यांनी दिले, तर रंगभूषा देवा सरकटे यांनी केली.
संत शिरोमणी कला मंच आणि नवी मुंबई बालरंगभूमीचा हा उपक्रम केवळ मनोरंजन नसून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा संस्कारांचा वारसा आहे. गेल्या २९ वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या ज्ञानयज्ञात आज तिसरी पिढीही सहभागी होताना दिसत आहे. एकेकाळी ज्या पालकांनी या मंचावर अभिनयाचे धडे घेतले, तेच आज आपल्या मुलांमध्ये कलेची आवड रुजवत आहेत. हा अभिनयाचा वारसा म्हणजे नवी मुंबईच्या सांस्कृतिक चळवळीचे मोठे यश असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
उपस्थित पालकांनीही या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.